सांगली : लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीसाठी सांगलीची जागा वादाचा विषय ठरली. या जागेवर ठाकरे गटाने परस्पर उमेदवार जाहीर केल्यामुळे काँग्रेसमध्ये कमालीची नाराजी पसरली. या नाराजीतूनच काँग्रेस नेते वेगळी भूमिका घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. ही शक्यता खरी ठरली असून जागावाटप जाहीर झाल्यानंतर काही काळ नॉट रिचेबल असलेल्या विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारीचा पर्याय निवडला आहे. त्यामुळे सांगलीत हा काँग्रेससाठी मोठा धक्का आहे.
विशाल पाटील यांच्या स्वीय सहायकाने त्यांच्यासाठी उमेदवारी अर्ज घेतला आहे. त्यामुळे आता काँग्रेसकडे वारंवार उमेदवारी मागणारे विशाल पाटील यांनी सांगलीमध्ये अखेर काँग्रेसविरोधात बंडखोरी केल्याचे स्पष्ट झाले आहे. विशाल पाटील हे अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करून ठेवणार आहेत असे असले तरी देखील काँग्रेसकडून तिकीट मागण्यावर देखील ते अद्याप ठाम आहेत.
काँग्रेसने सांगलीत उमेदवारी न दिल्यास विशाल पाटील यांचे सर्व समर्थक राजीनामे देणार आहेत. तसेच, आता विशाल पाटील यांच्या स्वीय सहाय्यकाने पाच उमेदवारी अर्ज घेतल्याने विशाल पाटील यांची बंडखोरी निश्चित झाली आहे. तसेच, वसंतदादा आघाडी नावाने विशाल पाटील हे आघाडी देखील स्थापन करणार असून त्यांच्या नावाने देखील स्वतंत्र उमेदवारी अर्ज भरण्यात येणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे.