लातूर : प्रतिनिधी
लातूर ते मिरज यादरम्यान धावणारी बार्शी लाईट रेल्वे बंद होऊन महत प्रयासाने लातूरला ब्रॉडगेज रेल्वे मिळाली. लातूर-मुंबई या ब्रॉडगेज रेल्वेत बसुन मुंबईला जाण्याचे लातूरकरांचे स्वप्न पुर्णत्वास आले. परंतु, गेल्या सहा-सात वर्षांपूर्वी लातूरकरांचा विरोध असतानाही मुंबई-लातूर रेल्वेचे विस्तारीकरण करुन ही रेल्वे मुंबई-लातूर-बीदर अशी करण्यात आली. तेव्हापासून लातूरच्या रेल्वे प्रवाशांवर अन्याय सूरुच आहे. आता तर दक्षीण मध्य रेल्वेने एक विचित्र षडयंत्र रचले असून बीदर-लातूर-मुंबई या रेल्वेत लातूरला फक्त १० टक्के रिमोट कोटा ठेवला आहे. त्यामुळे लातूरच्या रेल्वे प्रवाशांची मोठी गैर सोय होत आहे. याविरुद्ध आता लातूरकरांनीच पुन्हा एकदा पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे.
रेल्वे मंत्रालयाने रेल्वेच्या बाबतीत लातूरवर नेहमीच अन्याय केला आहे. लातूरकरांची कसलीही मागणी नसताना लातूरची ‘मदर रेल्वे’ बीदरला नेली. त्यामुळे लातूर-मुंबइर्् ही ७ दिवस चालणारी रेल्वे बीदर-मुंबई रेल्वेत रुपांतरीत झाली आणि बीदर-मुंबई ही रेल्वे ३ दिवसांवर आली. लातूर-मुंबई ही ७ दिवस चालणारी रेल्वे बीदरपर्यंत विस्तारीत करुन ती ३ दिवसांवर आणण्याचे षडयंत्र रचले गेले. यातून रेल्वे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. शांतताप्रिय लातूरच्या रेल्वे प्रवाशांना भडकावण्याचे षडयंत्र दक्षीण मध्य रेल्वेकडून सातत्याने रचले जात आहे. ते आजही थांबलेले नाही.
दक्षीण मध्य रेल्वेचा कोटा ७८० तर मध्य रेल्वेचा लातूरचा कोटा ८५ म्हणजेच फक्त १० टक्के आणि बीदरला ९० टक्के. रेल्वेच्या संपूर्ण उपलब्ध रिझर्वेशन कोट्यातून फक्त १० टक्के लातूरला आणि ९० टक्के कोटा इतरांना. फस्ट, सेकंड आणि थर्ड क्लास एसी, स्लीपरचा रिमोट कोटा दक्षीण मध्य रेल्वेने ९० टक्के घेतला आहे तर लातूरला फक्त १० टक्के दिला आहे. त्यामुळे लातूरला केवळ ८५ बर्थ मिळतात. यात फस्ट एसी बर्थच नाही. सेकंड एसी ६, थर्ड एसी १२ बर्थ तर ६७ एवढा स्लीपरचा कोटा आहे. दक्षीण मध्य रेल्वेचा बीदर ते लातूर रोड फस्ट क्लास एसी १०, सेकंड क्लास एसी ६६, थर्ड क्लास एसी १२८ तर स्लीपरचा कोटा ५७६ एवढा आहे. हा दक्षीण मध्य रेल्वेचा लातूरच्या बाबतीत दुटप्पीपणा का? लातूरबाबत इतका आकस का?, असे प्रश्न लातूरचे रेल्वे प्रवाशांना पडले आहेत.
- मुंबई-बीदर रेल्वेला जनरल कोटा द्यावा
दक्षीण मध्य रेल्वेकडुन नेहमीच लातूरच्या रेल्वे प्रवाशांची गैरसोय करण्याचे षडयंत्र रचले जात आहेत. लातूरची ‘मदर रेल्वे’ बीदरपर्यंत विस्तारीत करुन अधीच लातूरच्या रेल्वे प्रवाशांवर अन्याय केला गेला आता रिमोट कोटा ब्लॉक करुन अन्याय केला जात आहे. मुंबई-बीदर रेल्वेचा हा रिमोट कोटा रद्द करुन या रेल्वेला जनरल कोटा देण्यात यावा. यासाठी लातूरच्या खासदारांनी तसेच मध्य रेल्वेने अग्रही भूमिका घ्यावी व मुंबई-लातूर रेल्वेला जनरल कोटा मिळवून द्याव. बीदर, लातूरला समान न्याय द्यावा, अशी मागणी मध्य रेल्वे क्षेत्रीय सल्लागार समितीचे सदस्य शामसुंदर मानधना यांनी केली आहे.