मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असून राज्यात राजकीय व सामाजिक अस्थिरता निर्माण झाली आहे. सत्ताधारी आमदार संजय गायकवाड आणि खासदार अनिल बोंडे यांनी राहुल गांधी यांना जाहीर धमक्या देऊनही त्यांना अजून अटक झालेली नाही. प्रक्षोभक विधाने करून धार्मिक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यात दंगली घडवण्याचा सत्ताधारी पक्षांचा कट आहे त्यामुळे आपण हस्तक्षेप करून आदेश द्यावेत. राहुल गांधी यांच्या विरोधात हिंसक भाषा करणारे आमदार संजय गायकवाड आणि खासदार डॉ. अनिल बोंडे यांना अटक करावी, अशी मागणी काँग्रेस नेत्यांच्या शिष्टमंडळाने शनिवारी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे केली. या वेळी राज्यपालांनी वादग्रस्त विधानांबाबत गृह खात्याकडून माहिती घेऊन कारवाई करण्याचे आश्वासन काँगेस शिष्टमंडळाला दिले.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज राजभवन येथे जाऊन राज्यातील ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था, राज्यात निर्माण झालेले राजकीय आणि सामाजिक अस्थैर्य, विदर्भ आणि मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतक-यांचे झालेले नुकसान, या नुकसानभरपाईपोटी मदत न मिळाल्याने शेतक-यांमध्ये निर्माण झालेली प्रचंड अस्वस्थता या मुद्यांवर राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट घेऊन निवेदन दिले.
या भेटीत शिष्टमंडळाने राहुल गांधी यांच्या विरोधात सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी केलेल्या विधानांकडे राज्यपालांचे लक्ष वेधले. महाराष्ट्र हा सहिष्णुतेच्या राजकारणासाठी ओळखला जातो. असे असताना आमचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात हिंसक विधाने करण्यात आली. आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांची जीभ कापणा-यास बक्षीस देण्याची तर खासदार अनिल बोंडे यांनी राहुल गांधी यांच्या जिभेला चटके देण्याची अश्लाघ्य विधाने केली. लोकशाहीत विरोधकांवर टीका करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे; पण विरोध करताना जीवाला धोका निर्माण करणे, हिंसेला प्रवृत्त करण्याची भाषा लोकप्रतिनिधींनी वापरणे हे कायद्याला धरून नाही. या प्रकरणात मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी आणि पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. काँग्रेस नेत्यांच्या आंदोलनानंतर गुन्हे दाखल झाले; पण आमदार संजय गायकवाड आणि खासदार अनिल बोंडे यांना अजूनही अटक करण्यात आलेली नाही. या दोन्ही लोकप्रतिनिधींना तात्काळ अटक झाली पाहिजे, अशी मागणी शिष्टमंडळाने या वेळी केली.
मराठवाड्यात अतिवृष्टी होऊन ६ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे अजूनही पंचनामे झालेले नाहीत. केंद्रीय कृषिमंत्र्यांनी आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचा दौरे करून मदत जाहीर केली; पण महाराष्ट्रात मात्र अजूनही केंद्रीय कृषिमंत्री किंवा केंद्रीय पथक पाहणी करण्यास आले नाही. महाराष्ट्रातील शेतक-यांबाबत इतका दुजाभाव का? असा प्रश्न शिष्टमंडळाने उपस्थित केला.
राज्यात महिलांवरील अत्याचारात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून अल्पवयीन, शाळकरी मुलींवरील अत्याचाराच्या बदलापूर आणि नागपूर येथे घडलेल्या गुन्ह्यात आरोपींना पाठीशी घालण्याचे काम सरकारकडून केले जात आहे. स्पर्धा परीक्षा रखडल्या आहेत. उमेदवारांना सरकारकडून नियुक्त्या देण्यात आलेल्या नाहीत. युवा पिढी बेरोजगारीमुळे नैराश्याच्या गर्तेत जात आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी आपण सरकारला निर्देश द्यावेत, अशी मागणी काँग्रेसने राज्यपालांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
राज्यपालांना भेटलेल्या शिष्टमंडळात विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार चंद्रकांत हंडोरे, विशाल पाटील, आमदार नितीन राऊत, अस्लम शेख, अमीन पटेल, विश्वजित कदम, विक्रम सावंत, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, प्रवक्ते सचिन सावंत आदींचा समावेश होता.