28.1 C
Latur
Thursday, July 4, 2024
Homeमहाराष्ट्रमाझ्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा कट

माझ्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा कट

आमदार बच्चू कडूंचा दावा, पोलिसांना लिहिले पत्र

अमरावती : स्वत:च्या बळावर राज्यातील राजकारणात वेगळी ओळख निर्माण करणारे अमरावती जिल्ह्यातील अचलपूरचे अपक्ष आमदार बच्चू कडूंनी मोठा दावा केला आहे. आमदार कडूंनी पोलिस अधीक्षकांना पत्र लिहून माझ्याविरोधात अफवा पसरवून माझ्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा कट रचला जात आहे. यामुळे माझ्या जीवाला धोका निर्माण झाला आहे असा, गंभीर आरोप केला आहे. आमदार बच्चू कडूंनी केलेल्या आरोपामुळे राज्यात खळबळ उडाली असून, प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त केला जात असून, सुरक्षेची मागणी करण्यात येत आहे.

आमदार बच्चू कडूंनी या पत्रामध्ये लिहिले आहे की, आज सकाळी गोपनीय माहितीनुसार मला २ संदेश मिळाले आहेत. त्यामधून पहिल्या संदेशामध्ये दि. ४ मे २०२४ रोजी रात्रीच्या सुमारास विदर्भ मिल स्टॉप अचलपूर परिसरातील भाजीपाला विक्रेत्याजवळ दुचाकीवरून तोंडाला रुमाल बांधून एक माणूस आला आणि भाजीपाला विक्रेत्यासबोत चर्चा करताना म्हणाला की, मी शिंदे साहेबांचा कट्टर कार्यकर्ता आहे.

मी गडचिरोली येथे राहत असून नक्षलवाद्यांशी माझे जवळचे संबंध आहेत. बच्चू कडूला पाहून घेऊ. जसे बाळासाहेब ठाकरेंनी दिघेला संपविले तसेच शिंदे साहेब बच्चू कडूला संपवणार. नाहीतर मीच स्वत: बच्चू कडूला संपवणार. बच्चू कडू म्हणजे काहीच नाही, असे म्हणाला.

तर दुस-या संदेशामध्ये चांदूर बाजार शहरामधील एका हॉटेलमध्ये ३ व्यक्तींकडून माझ्या नावाचा उल्लेख करत, ‘आज मौका देख के कडू को चौका मारेंगे’ असा संवाद करत असल्याचा संदेश मिळाला असल्याचे आमदार बच्चू कडूंनी पोलिसांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. तर, माझा अपघात झाल्याची अफवा पसरवल्यामुळे गेले २ ते ३ दिवसांपासून माझ्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांचे, नागरिकांचे फोन येत आहेत. तरी दोन्ही संदेशांची चौकशी करून संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करावा. जर माझे काही बरेवाईट झाले तर त्याची सर्वस्वी जबाबदारी तुमची राहील, असा इशाराही बच्चू कडू यांनी पत्राव्दारे अमरावती पोलिस अधीक्षकांना दिला आहे. दरम्यान, पोलिस या प्रकरणावर काय निर्णय घेतात आणि आमदार बच्चू कडूंना अतिरिक्त सुरक्षा देण्यात येणार की नाही हे पहावे लागेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR