30.5 C
Latur
Saturday, April 19, 2025
Homeमहाराष्ट्रजयकुमार गोरेंच्या बदनामीचे षडयंत्र

जयकुमार गोरेंच्या बदनामीचे षडयंत्र

आरोपीने खा. सुप्रिया सुळे, रोहित पवार, प्रभाकर देशमुख यांना व्हीडीओही पाठवले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट राजकारण करा, पण एखाद्याला आयुष्यातून उठवू नका

मुंबई : प्रतिनिधी
मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामीचा जाणीवपूर्वक कट रचण्यात आला होता. या प्रकरणात गुंतवून संबंधित महिला व कथित युटयूबर तुषार खरात यांनी त्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे गोरे यांच्या बदनामीचे व्हीडीओ तयार केल्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे, आ. रोहित पवार आणि प्रभाकरराव देशमुख यांना पाठविण्यात येत होते असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केला.

आपण राजकारण करत असतो, पण कोणाला जीवनातून उठवण्याचे राजकारण करणे योग्य नाही. त्या महिलेला खंडणी घेताना रंगेहात पकडले आहे. याची चौकशी होईलच पण सुप्रिया सुळे, रोहित पवार यांनी आत्मचिंतन केले पाहिजे असेही मुख्यमंत्री म्हणाले. गृहमंत्री म्हणून प्रत्येक गोष्टीचा थेट संबंध माझ्याशी जोडला जातो. २०२२ ते २४ तुम्ही मला लक्ष्य केले. पण परिणाम काय झाला, लोकांनी आधीपेक्षा रेकॉर्ड बहुमत आम्हाला दिले. कुठलीही घटना झाली की काही लोक माझा सगेसोयरा करून टाकतात. झालेला प्रत्येक प्रसंग पाहा, गृह विभागाने कडक कारवाई केली आहे.

कोणी माझा सगासोयरा असला तरी कारवाई करायला मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा फडणवीसांनी दिला. विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज उत्तर दिले. अधिवेशन काळात जयकुमार गोरे यांच्यावर आरोप झाले होते. याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, खरे तर ही केस २०१९ मध्येच संपली होती. तेव्हा ते आघाडीसोबत होते. पण ती आता उकरून काढली गेली, त्यासाठी कट रचला गेला. संबंधित महिलेने प्रकरण मिटविण्यासाठी लाच मागितली, पोलिसांची त्या बाबत खात्री पटल्यानंतर ट्रॅप लावला गेला, तिचे संभाषण टेप करण्यात आले.

ती पकडली गेली. तुषार खरात हा कथित पत्रकार आणि अनिल सुभेदार यालाही अटक करण्यात आली. गोरेंविरुद्ध ज्यांनी कट रचला त्यात शरद पवार गटाचे लोक होते. त्याचे पुरावे आहेत. प्रभाकरराव देशमुख हे शंभरवेळा तिन्ही आरोपींशी बोलले आहेत. सुप्रिया सुळे, रोहित पवार, देशमुख यांच्याकडे गोरेंच्या बदनामीचे व्हिडिओ जाहीर करण्याआधी जात असत.आम्ही विरोधक आहोत, शत्रू नाही याचे भान ठेवा, या सगळ्यांनीच आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असे फडणवीस म्हणाले.

कठोर भूमिकेची गरज
आपण राजकीय शत्रू नाही विरोधक आहोत. पण अशा प्रकारे कोणाला जीवनातून उठवून टाकायचे प्रकार होत असतील तर चुकीचे आहेत. हक्कभंग समिती आहे, पण तिला नखंच नाहीत. रोज कोणीतरी उठतो, सभागृहाविरोधात बोलतो. मंर्त्यांनी काम करू नये म्हणून दबाव येईल असे वक्तव्य करतात. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या अवमानाबाबत आपण चर्चा केली. पण उद्धव ठाकरे गटाच्या एक नेत्या आज तीच कविता वाचून दाखवितात.

या सभागृहात बसणा-यांचा काही सन्मान आहे की नाही. इथे संविधानाच्या बाता करायच्या आणि त्याच सभागृहाचा अवमान करायचा. रोज सकाळी नऊ वाजता भोंगा वाजवायचा. आमच्या वैयक्तिक अपमानासाठी हक्कभंगाचा वापर करू नका. पण ज्याने सभागृहाचा अवमान होतोय, तिथे मात्र कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली.

संविधान माझा सगा व १३ कोटी लोक सोयरे
हल्ली काही घडले की त्याचा संबंध गृहमंत्री असल्याने माझ्याशी जोडला जातो, माझे सगेसोयरे आहेत असे सांगितले जाते. पण मी एकच सांगतो, की संविधान माझे सगे आहेत आणि राज्यातील १३ कोटी जनता हेच माझे सोयरे आहेत. माझा कोणी कितीही जवळचा अपराधी असेल तर त्याला सोडणार नाही असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावले. समाजाचा जो शत्रू असेल त्याला मी सोडणार नाही. तुमचा आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न असतो पण मी एकनाथ शिंदे, अजित पवार असे आम्ही एकमेकांच्या पायात पाय घालणारे नाही, हातात हात घालून राज्य चालविणार आहोत, असे फडणवीस यांनी विरोधकांना सुनावले.

शिवरायांचा अवमान करणारांना सोडणार नाही
छत्रपती शिवाजी महाराज हे आम्हा सर्वांचे दैवत आहे. त्यांच्याबद्दल अवमानस्पद भाषा वापरणा-यांना सोडले जाणार नाही. प्रशांत कोरटकर याला काल तेलंगणातून अटक करण्यात आली. तो कोणत्या पक्षाच्या नेत्याच्या घरात सापडला हे सांगू का ? असे विचारत मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांनाच गर्भित इशारा दिला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR