26.4 C
Latur
Wednesday, March 26, 2025
Homeमहाराष्ट्रबांधकाम कामगारांना निवृत्ती वेतन मिळणार

बांधकाम कामगारांना निवृत्ती वेतन मिळणार

वार्षिक १२ हजार रुपये मिळणार, फुंडकरांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी
राज्य सरकारने बांधकाम कामगारांसाठी मोठा निर्णय घेतला असून, राज्याचे श्रमविभाग तथा कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी बांधकाम कामगारांना ६० वर्षे वयानंतर निवृत्ती वेतन देण्यात येणार असल्याची घोषणा केली. कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या भवितव्याच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मंत्री आकाश फुंडकर यांनी आज विधानसभेत दिली. मंडळाकडे नोंदणीकृत बांधकाम कामगारांना दरवर्षी १२ हजार रुपये निवृत्तीवेतन दिले जाणार आहे, असे फुंडकर म्हणाले.

इमारत आणि इतर बांधकाम व्यवसायातील कामगारांच्या हिताच्या संरक्षणार्थ केंद्र सरकारने १९९६ ला कायदा लागू केला. त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याने २००७ मध्ये नियम बनवले. या नियमाअंतर्गत २०११ साली महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ मुंबईची स्थापना करण्यात आली. १८ ते ६० वर्षे वयोगटातील बांधकाम कामगारांची मंडळाकडे नोंदणी करुन घेतली जाते. त्यांना विविध योजनांचा लाभ दिला जातो, असे आकाश फुंडकर यांनी सांगितली. यानंतर त्यांनी बांधकाम कामगारांसाठी मोठी घोषणा केली.

कायद्यामधील तरतुदी आणि केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन याबाबतची सविस्तर कार्यपद्धती निश्चित करण्यात येईल. सध्या मंडळाकडे नोंदणी असणा-या ५८ लाख कामगारांच्या कुटुंबीय आणि यापुढे मंडळाकडे नोंदणी होणा-या कामगारांचे कुटुंबियांचे भवितव्य सुरक्षित होणार आहे, असे मंत्री फुंडकर म्हणाले.

दरवर्षी १२ हजार रुपये निवृत्ती वेतन
वयाची ६० वर्षे पूर्ण केल्यानंतर बांधकाम कामगार मंडळाकडे नोंदणी होऊ शकत नाही. तसेच त्यांना कोणत्याही मंडळाचा लाभ मिळत नाही. ही बाब विचारात घेऊन मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या आणि वयाची ६० वर्षे पूर्ण केलेल्या बांधकाम कामगारांना दरवर्षी १२ हजार रुपये इतके निवृत्ती वेतन देण्यात येईल, अशी मोठी घोषणा आकाश फुंडकर यांनी केली.

नोंदणीला १० वर्षे झाल्यास वार्षिक ६ हजार मिळणार
कामगारांना १० वर्षे नोंदणी कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना ५० टक्केच्या मर्यादेत प्रतिवर्षी ६ हजार, १५ वर्षे नोंदणी कालावधी पूर्ण झाल्यानंतर ७५ टक्के मर्यादित प्रतिवर्षी ९ हजार आणि २० वर्षे नोंदणी कालावधी पूर्ण झाल्यानंतर प्रतिवर्षी १२ हजार रुपये इतके निवृत्ती वेतन देण्यात येईल, अशीदेखील माहिती आकाश फुंडकर यांनी सभागृहात दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR