नवी दिल्ली : ३२ दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेले शेतकरी नेते जगजीत डल्लेवाल यांच्या प्रकृतीबाबत सर्वोच्च न्यायालयाने पंजाब सरकारला नोटीस बजावली आहे. डल्लेवाल यांना देण्यात येत असलेली वैद्यकीय मदत सुरूच ठेवावी असे न्यायालयाने शुक्रवारी सांगितले.
पंजाबच्या मुख्य सचिवांविरोधातील सामग्री याचिकेवर कोर्टात सुनावणी सुरू आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठाने सांगितले- कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती असेल तर त्यावर कठोरपणे कारवाई केली पाहिजे. कोणाच्या तरी जिवाला धोका आहे, पंजाब सरकारला हे गांभीर्याने घ्यावे लागेल.
न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले की, उद्याच्या सुनावणीदरम्यान आम्ही जगजीत डल्लेवाल यांच्याशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलू. त्यानंतर काही आदेश देऊ. न्यायालयाचे पहिले प्राधान्य त्यांचे जीवन आहे.
डल्लेवाल पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (एमएसपी) हमी देण्यासाठी कायदा करण्याची मागणी करत आहेत. डल्लेवाल ३२ दिवस उपोषणावर, पाणीही सोडले ७० वर्षीय शेतकरी नेते जगजीत डल्लेवाल ३२ दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. पूर्वी त्यांनी अन्न खाणे बंद केले होते, आता ते पाणीदेखील पीत नाहीत. पाणी प्यायल्यानंतर त्यांना उलट्या होतात. त्यांचे सहकारी शेतकरी नेते अभिमन्यू कोहर यांनी सांगितले की, त्यांचा रक्तदाब ८८/५९ झाला आहे.
६० वर्षांवरील पुरुषाचा सामान्य रक्तदाब १३३/६९ मानला जातो. डल्लेवाल यांची प्रतिकारशक्तीही खूपच कमकुवत झाली आहे. मात्र त्यांनी वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिला आहे.