मुंबई : अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या २०२४- २५ वर्षाच्या अंतरिम अर्थसंकल्प आज (दि.२७ ) विधानसभेत सादर केला. अर्थसंकल्पात एकूण खर्चासाठी ६ लाख ५२२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बजेटवर प्रतिक्रिया दिली आहे. महायुती सरकारचा बजेट म्हणजे यांचे कंत्राटदार मित्र जोमात आणि शेतकरी कोमात असा असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. विधीमंडळाच्या बाहेर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, जयंत पाटील अर्थमंत्री होते त्यामुळे माझ्या पेक्षा जास्त त्यांना माहीत आहे. आजचा अंतरिम अर्थसंकल्प पाहिला तर निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा बजेट मांडला आहे. अवकाळी पावसाचा राज्याला फटका बसला आता या घोषणाचा फटका बसेल की काय अशी अवस्था आहे. मुंबईत रस्ते घोटाळा आहे, टेंडर वर टेंडर लोक काढत आहेत.
पुढचं पाठ मागचं सपाट, अशी सरकारची अवस्था
महायुती सरकारचा बजेट म्हणजे यांचे कंत्राटदार मित्र जोमात आणि शेतकरी कोमात असा हा अर्थसंकल्प आहे. नवीन रस्त्याच्या घोषणा, पहिल्या घोषणाचे काय असा प्रश्न आहे. मराठी भाषा भावनांचा आम्ही उल्लेख केला तोच आहे. पुढच पाठ मागच सपाट, अशी सरकारची अवस्था आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी नमूद केले. आमचे सरकार यांनी पाडून एक दीड वर्ष होऊन गेले. देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रस्ताव पाठवला असेल नको त्या चौकशा करण्यापेक्षा प्रस्ताव पाठवा ना, असेही ठाकरे यावेळी म्हणाले.
जरांगे पाटील यांना तुम्ही अतिरेकी ठरवणार आहात का?
जरांगे पाटील यांच्यावर लाठीहल्ला झाला. महिलांची डोकी फोडली होती. आमच्याकडून कोणी त्यांना किती फोन केले? हे आताच्या महासंचालक आहेत. त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी सांगावे. जरांगे पाटील यांना तुम्ही अतिरेकी ठरवणार आहात का? जरांगे पाटील यांची मागणी सोडून त्यांच्या मागे का लागता? असा सवलाही उद्धव ठाकरे यांनी केलाय. एक महिन्यापूर्वी त्यांच्यावर गुलाल कोणी उधळला याची चिवट तपासणी करा, अशी मागणीही ठाकरे यांनी यावेळी बोलताना केली आहे.