सातारा : क-हाड येथील विमानतळावर विमान चालविण्याचे प्रशिक्षण देत असताना प्रशिक्षणार्थी पायलटचे नियंत्रण सुटल्यामुळे विमान काही फूट अंतरावरुन जमिनीवर कोसळले. त्यामध्ये पायलट जखमी झाला. गुरूवारी सकाळी दहा वाजण्याच्या ‘सोलो ट्रेनिंग’ सुरु असताना ही दुर्घटना घडली.
क-हाडच्या विमानतळावर मुंबईच्या दमानिया एअरवेजच्या ऍम्बिसिअन्स फ्लाईग क्लबने आठ महिन्यांपूर्वी वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. याठिकाणी वीस प्रशिक्षणार्थींची पहिली बॅच प्रशिक्षण घेत आहे. सध्या ‘सोलो ट्रेनिंग’ (प्रशिक्षणार्थीने एकट्याने विमान चालविणे) सुरू आहे. गुरूवारी सकाळी एक प्रशिक्षणार्थी हे प्रशिक्षण घेत होता. धावपट्टीवरुन हे फोर सीटर विमान धावत असताना त्याची पॉवर वाढली आणि विमान हवेत उडाले. त्यानंतर काही क्षणातच ते धावपट्टीवर दक्षिण बाजुच्या संरक्षक भ्ािंतीजवळ कोसळले. त्यानंतर प्रशिक्षणार्थींसह अधिकारी व सुरक्षारक्षकांनी त्याठिकाणी धाव घेत प्रशिक्षणार्थीला अपघातग्रस्त विमानातून बाहेर काढले.