25.6 C
Latur
Monday, July 14, 2025
Homeराष्ट्रीयवेश बदलून अजित-अमित भेटीवर वादंग

वेश बदलून अजित-अमित भेटीवर वादंग

अजित पवारांवर सुप्रिया सुळे संतापल्या चौकशीची केली मागणी

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटण्यासाठी मुळात अजित पवार वेश बदलून का जात होते? त्यांच्यात इतके काय शिजत होते? दिल्ली आणि मुंबई विमानतळाची यासंदर्भात चौकशी झाली पाहिजे. अजित पवार नाव आणि वेश बदलून विमानतळावरून कसे गेले? यासाठी त्यांना परवानगी कशी मिळाली? असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी संतप्त भूमिका घेतली आहे.

दिल्लीत माध्यमांशी सुप्रिया सुळेंनी संवाद साधला. त्यावेळी त्या म्हणाल्या की, राज्याचे तत्कालीन विरोधी पक्षनेते नाव बदलून प्रवास करतात. अजित पवारांनी असे केले. उद्या एखादा अतिरेकी हेच उदाहरण घेऊन असे कृत्य करेल. हा पूर्णपणे देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. याबाबत मुंबई, दिल्ली विमानतळासह एअरलाईन्सची चौकशी झाली पाहिजे. एअरलाईन्सने ज्यांना ओळखत नाही त्यांना प्रवासाची परवानगी कशी दिली? आम्हालाही आधार कार्ड दिले जाते. नागरी विमान वाहतूक मंत्रालयानेही याबाबत उत्तर दिले पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. तसेच उद्या एखादा अतिरेकी देशात आला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? मुळात अजित पवार चोरून वेश बदलून का अमित शाहांना भेटायला येत होते.

त्यांच्यात असे नेमके काय शिजत होते? विशेष म्हणजे अजित पवार त्यांच्यासोबत गेले त्याच्या केवळ पाच दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी अजित पवारांवर आरोप केले. एकीकडे मोदी अजित पवारांवर आरोप करत होते आणि दुसरीकडे अजित पवार अमित शाह यांची भेट घेत होते. नेगोशिएट करत होते. मग ना खाऊंगा ना खाने दुंगा कुठे गेले? हे वॉशिंग मशीन नाही का? सगळे म्हणतात भाजप म्हणजे भ्रष्ट जुमला पार्टी झाली आहे. आता देवेंद्र फडणवीस आणि मोदीच याचे उत्तर देतील असा टोलाही सुप्रिया सुळेंनी लगावला.
अजित ताठ मानेने गेले असते

जर शरद पवारांना माहिती असते तर चोरुन जायची काही गरजच नव्हती. अजित पवार ताठ मानेने ऑफिशिअल बुकींग करुन विमानाने गेले असते. कोणी विचारले, कशाला दिल्लीला चाललात. सहा जनपथ आहे. त्यांच्या काकांचे तर घर आहे, चोरी कसली. हे आपले संस्कार आहेत का? पुढची पिढी काय म्हणेल? त्यावेळी जे विरोधीपक्ष नेते होते, जे आज उपमुख्यमंत्री आहेत, ते नाव बदलून जातात, हे या महाराष्ट्राचे आणि देशाचे राजकारण आहे का? जिथे देशाचे गृहमंत्री नियम कायदे बनवतात, त्यांना भेटायलाच चुकीचे नाव लावून जाता, संविधानाच्या चौकटीत याला जागा नाही असेही सुप्रिया सुळेंनी ठणकावले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR