28.6 C
Latur
Thursday, May 15, 2025
Homeमहाराष्ट्रफुलेंच्या जयंतीदिनी वादाची ठिणगी

फुलेंच्या जयंतीदिनी वादाची ठिणगी

उदयनराजेंच्या वक्तव्याने ओबीसींत नाराजी राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया

पुणे : महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मात्र या कार्यक्रमात उदयनराजेंनी केलेल्या एका वक्तव्यामुळे नवा वाद उद्भवला असून महात्मा फुलेंवरील केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून ओबीसी समाजाने नाराजी व्यक्त केली आहे.

उदयनराजे भोसले म्हणाले, ‘एका दृष्टिकोनातून पाहिले तर महात्मा फुलेंनी थोरले प्रतापसिंह महाराज यांचे अनुकरण केले. स्त्री शिक्षणाच्या बाबतीत जर कोणी सर्वप्रथम पाऊल उचलले असेल, तर ते प्रतापसिंह महाराज होते. त्यांनी स्वत:च्या राजवाड्यात स्त्रियांसाठी शाळा सुरू केली होती. विशेष म्हणजे, याच राजवाड्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण झाले. या वक्तव्यावर ओबीसी नेते मंगेश ससाणे यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे.

त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले, उदयनराजेंचे वक्तव्य मी तीन-चार वेळा ऐकले. ते फुले वाड्यावर आले, त्याचा आदर आहे. पण महात्मा फुलेंच्या जयंतीच्या दिवशी येऊन त्यांच्या कार्याचे महत्त्व कमी करून आपल्या पूर्वजांचे महत्त्व वाढवणे योग्य नाही. पण आज फुलेंच्या कार्याचे महत्त्व कमी करायचा प्रयत्न धक्कादायक आहे असे ते म्हणाले. महात्मा फुले जयंतीच्या निमित्ताने फुलेंच्या कार्यावर प्रकाश टाकण्याऐवजी त्यांच्या योगदानावर प्रश्न उपस्थित करणा-या उदयनराजे भोसले यांच्या वक्तव्यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

इतिहास साक्षी आहे : सपकाळ
मुलींची पहिली शाळा फुले दाम्पत्य यांनी सुरू केली नाही, असे खासदार उदयनराजे यांनी सांगणे दुर्देवी असल्याचे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केले आहे. इतिहास साक्षी आहे की, सावित्रीबाई फुले यांचे योगदान सर्वांसमोर आहे. सावित्रीबाई फुले यांनी प्रथम मुलींची आणि अस्पृश्य यांच्यासाठी शाळा सुरू केली. फुले यांचे योगदान मोठे असून छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी नेमकी कुठे हे १९८ वर्ष लपवले गेले. ती समाधी फुले यांनी शोधली आणि खरा इतिहास जनतेसमोर आणला असे सपकाळ म्हणाले.

ओबीसी असल्याने अपमान : आंबेडकर
महात्मा ज्योतिराव फुले हे ओबीसी होते. ते जर मराठा असते तर त्यांचा अपमान झाल्यानंतर काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांचा पक्ष रस्त्यावर उतरला असता, अशा शब्दांत प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR