नाशिक : प्रतिनिधी
जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे तसेच पिठोरी अमावास्या आणि बैलपोळा असल्याने बाजारात कोथिंबिरीपाठोपाठ मेथीची आवक देखील कमी झाली आहे. परिणामी नाशिक बाजार समितीमध्ये कोथिंबीर आणि मेथीने उच्चांकी भाव गाठला. कोथिंबीर ४५० तर मेथी चक्क २५० रुपये जुडीप्रमाणे विकली गेली. विक्रीला आणलेल्या कोथिंबीर आणि मेथीला रेकॉर्डब्रेक भाव मिळाल्याने शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र दुसरीकडे ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले.
नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे शेतातील उभे पीक खराब झाले आहे. त्यातच बैलपोळा आणि पिठोरी अमावास्या असल्याने बाजारात केवळ पंधरा टक्के शेतीमाल आला परिणामी कोथिंबीर आणि मेथीला ऐतिहासिक विक्रमी भाव मिळाला.
शेतक-यांना कोथिंबिरीला साडेचारशे रुपये जुडी तर मेथीला २४० रुपये जुडी असा भाव मिळाला. दहा दिवसांपूर्वी याच बाजार समितीमध्ये कोथिंबिरीला २५० रुपये जुडी इतका भाव मिळाला होता. तर मेथी जुडी कमाल २५० तर किमान ७० रुपये दराने विक्री होत आहे.