22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईतही कोरोनाचे वाढते रुग्ण, पालिका प्रशासन सतर्क

मुंबईतही कोरोनाचे वाढते रुग्ण, पालिका प्रशासन सतर्क

मुंबई : राज्यासह देशात कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. सध्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. कोविडच्या नव्या जेएन१ व्हेरिएंटविषयी मुंबई महापालिका आरोग्य विभागाकडून माहिती देण्यात येत आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य कार्यकारी अधिकारी दक्षा शाह यांनी कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटबाबत सूचना दिल्या आहेत. दक्षा शाह यांनी कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटसंदर्भात माहिती देताना सांगितले की, कोरोनाचा जेएन १ नावाचा नवा व्हेरिएंट सापडला आहे. मात्र, हा व्हेरिएंट सौम्य स्वरूपाचा आहे, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये.

मुंबई महानगरपालिकेकडून रुग्णांच्या उपचारा संदर्भात सर्व उपाययोजना आणि तयारी करण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेच्या आरोग्य कार्यकारी अधिकारी दक्षा शाह यांनी सांगितले की, मुंबई उपाययोजना आणि सुविधांनी सुसज्ज आहे. रुग्णालयातील खाटा, औषधे यांचा आढावा घेण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या गाईडलाईननुसार पुढील तयारी सुरू आहे. टेस्टिंग करून नव्या व्हेरिएंटचे संक्रमण तपासण्यात येणार आहे. आरटीपीसीआर टेस्ट वाढवण्यात येणार आहेत. नागरिकांनी भीती बाळगण्याची गरज नाही, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

नागरिकांनी घाबरू नये, काळजी घ्यावी
राज्यासह देशभरात कोरोनाच्या नव्या जेएन १ व्हेरिएंटचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. त्यामुळे आरोग्य विभाग आणि पालिका प्रशासन सतर्क झाले आहे. दरम्यान, कोरोनाचा नवा जेएन १ व्हेरिएंट सौम्य असल्याने नागरिकांनी घाबरू नये, मात्र काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. मास्क वापरणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, अशा सूचनाही प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्रात ५०० हून अधिक कोरोना रुग्ण
देशासह राज्यातही कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रात सध्या १०० हून अधिक कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये नव्या जेएन १ व्हेरिएंटच्या रुग्णांचाही समावेश आहे. मुंबईतही १९ कोरोना रुग्ण आढळले आहेत, मात्र दिलासादायक बाब म्हणजे यातील एकही रुग्ण नवीन जेएन १ व्हेरिएंटचा नाही. सध्या सर्व रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR