19.4 C
Latur
Wednesday, January 8, 2025
Homeमहाराष्ट्रमहामंडळाचा इलेक्ट्रिक बस प्रकल्प तोट्यात

महामंडळाचा इलेक्ट्रिक बस प्रकल्प तोट्यात

एसटी कर्मचारी कॉंग्रेसचा दावा, एक किलो मीटरला सरासरी २० रुपयांचे नुकसान!

नागपूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा (एसटी बस) इलेक्ट्रिक बस प्रकल्प तोट्यात असल्याचा धक्कादायक दावा महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसकडून करण्यात आला. इलेक्ट्रिक बस प्रकल्पात एसटीचे सरासरी एका किलोमीटर मागे २० रुपये इतके नुकसान होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

एसटी महामंडळाच्या इलेक्ट्रिक बस प्रकल्पाअंतर्गत एकूण १६८ बस सुरू आहेत. भविष्यात येणा-या एकूण ५ हजार १५० बस पूर्णपणे एसटीच्या ताफ्यात दाखल झाल्या व करारात ठरल्याप्रमाणे या प्रकल्पातील बस मार्गावर चालल्या नाहीत तरी त्यांना प्रतीदिवस प्रतिबस ठरलेली ३२५ किलोमीटरची हमी रक्कम द्यावी लागेल.

दरम्यान, ५ हजार १५० बसेस सरासरी १५.४५ लाख किमी अंतर चालल्या किंवा नाही चालल्या तरी किमान प्रतिदिवस प्रतिबस प्रती कि.मी. २० रुपये इतका तोटा होऊन सुमारे ३ कोटी २५ लाख रुपये इतका खर्च होईल आणि तेवढाच तोटा सहन करावा लागणार आहे. यातून महिन्याला सुमारे १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त तोटा सहन करावा लागणार असून वर्षाला सुमारे १ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त तोटा सहन करावा लागणार आहे.

सद्यस्थितीचा विचार करता आता ज्या गाड्या सुरू आहेत. त्यांचा एकंदर अभ्यास करून फेरविचार करण्याची गरज असून या पुढेसुद्धा हा प्रकल्प चालवायचा असेल किंवा रद्द करायचा असेल तर अभ्यास समिती नेमण्याची गरज आहे. भाडेतत्वावर बस पुरविणा-या कंत्राटदार कंपन्यांनी इतर शासकीय उपक्रमांमध्ये किंवा इतर राज्यांमध्ये काय दर निश्चित केले आहेत, तिथे हे दर का कमी आहेत, यावरही अभ्यास केला पाहिजे, असे महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी म्हटले आहे.

भाडेतत्वावरील बस कंत्राटात हेराफेरी
एसटीच्या ताफ्यात नव्याने येणा-या १ हजार ३१० भाडेतत्वावरील बस कंत्राटाच्या निविदेत हेराफेरी झाली व ऐनवेळी नियम व अटी विशिष्ट कंत्राटदारांना फायद्याच्या ठरतील, अशाच पद्धतीने टाकण्यात आल्याने शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे महामंडळाचे भविष्यात होणारे नुकसान टाळण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: हस्तक्षेप करून सदर प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारच्या परिवहन मंत्रालयाला दिले आहेत. आता इलेक्ट्रिक बस प्रकल्पाचे नुकसान टाळण्यासाठी चौकशी करावी, अशी मागणी बरगे यांनी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR