पंढरपूर/प्रतिनिधी
पंढरपुरात येणा-या भाविकांना चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी पंढरपुरात उजैन व वाराणसीच्या धर्तीवर कॉरिडॉर करण्यात येणार आहे. कॉरिडॉरसाठी भूसंपादन करताना ज्या नागरिकांच्या मालमत्ता जाणार आहेत, त्यांना चांगला मोबदला देण्यात येईल. तीन महिन्यांत भूसंपादन करण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे.
त्यानंतर लगेचच कामाला सुरुवात होईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी पंढरपूर येथे पत्रकारांशी बोलताना दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस शनिवारी पंढरपूर दौ-यावर आले होते. त्यांनी विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विठ्ठल-रुक्मिणी मंदिरास प्राचीन लूक व संवर्धन करण्यासाठी शासनाने १५० कोटी रुपयांचा निधी दिला. यामधून मंदिरास पुरातन लुक व संवर्धन करण्याचे काम सुरू आहे. हे काम आषाढी यात्रेच्या अगोदर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. पंढरपूर साठी जिल्हा प्रशासनाने आराखडा तयार केला आहे. त्यानंतर सर्वांना विश्वासात घेऊन कॉरिडॉरचे काम केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.