परभणी : शहरात गेल्या ९ वर्षांपासून परभणी मार्केट कमिटीच्या अंतर्गत सीसीआयने कापूस खरेदी बंद केली होती. कापूस खरेदी बंद झाल्याने याचा बाजार पेठेवर मोठा परिणाम होत असल्याने हे केंद्र तात्काळ सुरू करावे अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली होती. या मागणीनुसार परभणी येथील सीसीआय केंद्राला मंजुरी मिळाली असल्याची माहिती भाजपाचे परभणी विधानसभा प्रमुख आनंद भरोसे यांनी दिली आहे.
भारतीय जनता पार्टी व संजीवीनी मित्र मंडळाने आयोजित केलेल्या कृषी संजीवनी महोत्सवामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे परभणी शहरात केंद्र सरकारचे सीसीआय कापूस खरेदी केंद्र बंद पडले असून ते चालू करण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच बाजार समितीच्या पहिल्याच बैठकीत माझ्यासह बाजार समिती संचालक विलास बाबर, राजेश देशमुख, सुरेश भुमरे यांनी शेतक-यांना सीसीआय खरेदी केंद्र सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाची ख-या अर्थाने पुर्तता होत असल्याचे भरोसे यांनी म्हटले आहे. तसेच केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल, राज्य वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत.
परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन घेतले जाते. पूर्वी परभणी मार्केट कमिटीच्या अंतर्गत जवळपास १० लाख क्विंटल पर्यंत आवक होत होती. पण काही कारणास्तव जवळपास २०१४ पासून परभणी मार्केट कमिटीच्या अंतर्गत सीसीआयने कापूस खरेदी बंद केली होती. कापूस खरेदी होत नसल्याने याचा बाजार पेठेवर मोठा परिणाम होत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे कळवण्यात आले होते. या निवेदनाची दखल घेत केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल व राज्य वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सीसीआय केंद्राला मंजुरी दिल्याने परभणी कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच शेतकरी, बाजारपेठेला पुन्हा एकदा नवसंजीवनी प्राप्त होणार असल्याचे श्री. भरोसे यांनी कळवले आहे.