23.7 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeसंपादकीय विशेषरुपेरी पडद्यावरील ‘कोर्ट ड्रामा’

रुपेरी पडद्यावरील ‘कोर्ट ड्रामा’

हिंदी सिनेसृष्टीत आजवर कोर्टरूम ड्रामावर अनेक चित्रपट बनवले गेले आणि त्यातील बहुतेकांना पसंती मिळाली. या चित्रपटांना समीक्षकांबरोबरच प्रेक्षकांनीही दाद दिली. अशा काही चित्रपटांमध्ये कॉमेडीचा मसालाही दिसला; तर काहींमध्ये थरार होता. न्यायालयीन कामकाज हा समाजाचा आणि न्यायव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळेच अनेक चित्रपटांमध्ये अशा कार्यवाहीला महत्त्वाचे स्थान दिले गेले. असे अनेक चित्रपट आहेत ज्यांचा क्लायमॅक्स किंवा कथानकाचा टर्निंग पॉईंट कोर्टरूम सीन होता कोर्टात एखाद्या रंजक प्रकरणावर जेव्हा चर्चा होते तेव्हा प्रत्येकाला ते बघायचे असते. चित्रपटातील दृश्यांच्या माध्यमातून ही सुप्त इच्छा पूर्ण होते.

र्वीच्या काळापासूनचे चित्रपट पाहिल्यास अनेक हिंदी चित्रपटांमधील न्यायालयीन दृश्यांमध्ये ‘मी गीतेवर हात ठेवून शपथ घेतो’ हे साक्षीदाराचे विधान हमखास दिसायचे. किंबहुना, काही चित्रपटांचे कथानक तर या विधानानंतर दिलेल्या साक्षीने कलाटणी घ्यायचे. प्रेक्षकांनी प्रत्यक्ष न्यायालयीन कामकाज पाहिलेले नसते; परंतु चित्रपटांमध्ये पाहिलेल्या या कार्यवाहीवरून त्यांना न्यायालयांमध्ये कोणत्या प्रकारची उलटतपासणी होते याची कल्पना येते. कोर्टात एखाद्या रंजक प्रकरणावर जेव्हा चर्चा होते तेव्हा प्रत्येकाला ते बघायचे असते. चित्रपटातील दृश्यांच्या माध्यमातून ही सुप्त इच्छा पूर्ण होते. हिंदी सिनेसृष्टीत आजवर कोर्टरूम ड्रामावर अनेक चित्रपट बनवले गेले आणि त्यातील बहुतेकांना पसंती मिळाली. या चित्रपटांना समीक्षकांबरोबरच प्रेक्षकांनीही दाद दिली. अशा काही चित्रपटांमध्ये कॉमेडीचा मसालाही दिसला; तर काहींमध्ये थरार होता. पडद्यावर दोन वकील वाद घालतात तेव्हा प्रेक्षक हरखून जातात. कारण, चित्रपटांमध्ये न्यायालयातील प्रसंग मोठ्या मेहनतीने तयार केले जातात. यामध्ये प्रामुख्याने भर असतो तो संवादांवर. न्यायालयीन कामकाज हा समाजाचा आणि न्यायव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळेच अनेक चित्रपटांमध्ये अशा कार्यवाहीला महत्त्वाचे स्थान दिले गेले. असे अनेक चित्रपट आहेत ज्यांचा क्लायमॅक्स किंवा कथानकाचा टर्निंग पॉईंट कोर्टरूम सीन होता.

१९८६ मध्ये प्रदर्शित झालेला बासू चॅटर्जी यांचा ‘एक रुका हुआ फैसला’ हा चित्रपट आजही एक अनोखा चित्रपट म्हणून ओळखला जातो. त्याचे कथानक इतके सामर्थ्यवान होते की, तो आतापर्यंतच्या सर्वोत्कृष्ट कोर्टरूम ड्रामा चित्रपटांमध्ये गणला जातो. ही कथा ज्युरी सदस्यांमधील तणाव, कोंडी आणि न्यायाप्रती त्यांची बांधीलकी दाखवते. विशेष म्हणजे या संपूर्ण चित्रपटाचे चित्रीकरण एका खोलीत झाले आहे. या चित्रपटाचा रिमेक करण्याचा विचार सध्या सुरू आहे. बी. आर. चोप्रा यांनी १९६० मध्ये बनवलेल्या ‘कानून’या गीतांशिवाय बनलेल्या पहिल्या चित्रपटाची कथा अख्तर उल-इमान आणि सी. जे. पावरी यांनी लिहिली आहे. त्यात फाशीच्या शिक्षेविरुद्धचा खटला होता. साक्षीदारांनाही फसवले जाऊ शकते आणि खोटी साक्ष दिल्याने एखाद्याचा मृत्यू होऊ शकतो, असा युक् ितवाद करण्यात आला. राज कपूरच्या १९५१ मध्ये आलेल्या ‘आवारा’ चित्रपटात त्यांचे वडील पृथ्वीराज कपूर यांनी वकील आणि न्यायाधीशाची भूमिका साकारली होती, जो एका गैरसमजामुळे आपल्या मुलाला आणि पत्नीला जन्मापूर्वी सोडून देतो. या चित्रपटात वकिलाची भूमिका करणा-या नर्गिससोबत पृथ्वीराज कपूरची उलटतपासणी पाहता हा कोर्टरूम ड्रामा रंजक झाला.

यश चोप्रांचा प्रसिद्ध चित्रपट ‘वक्त’ देखील एका कुटुंबाच्या विघटनाने सुरू होतो. त्यातील न्यायालयाची दृश्ये संस्मरणीय आहेत. या चित्रपटात सुनील दत्तने वकिलाची भूमिका केली होती. ‘वक्त’ हा हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिला मल्टीस्टारर चित्रपट असल्याचे म्हटले जाते. शंकर मुखर्जी दिग्दर्शित १९६२ साली प्रदर्शित झालेला ‘बात एक रात की’ हा चित्रपट रहस्यमय आणि थराराने भरलेला कोर्टरूम ड्रामा होता. या चित्रपटाची नायिका वहिदा रहेमान हिच्यावर खुनाचा आरोप असतो, पण, वकील देव आनंद आरोपींच्या कबुलीवर विश्वास ठेवत नाहीत. येथूनच रोमांचक नाटक सुरू होते. १९८३ मध्ये आलेला ‘अंधा कानून’ हा चित्रपट न्यायालयीन कामकाजाची समीक्षा करणारा आणि कायद्यातील पळवाटांचा गैरफायदा घेणा-यांवर आसूड ओढणारा ठरला. या चित्रपटात अमिताभ बच्चन (जान निसार अख्तर) यांनी वन अधिका-याची भूमिका साकारली होती, ज्याचा चंदन तस्करांशी संघर्ष होतो. यामध्ये एक तस्कर मारला जातो आणि त्याबाबत अमिताभला दोषी धरले जाते. तुरुंगवासाची शिक्षा भोगल्यानंतर हत्येच्या गुन्ह्यात शिक्षा झालेली व्यक्ती जिवंत असल्याचे सत्य समोर येते. या चित्रपटाचा क्लायमॅक्स अतिशय नाट्यमय होता. ‘मेरी जंग’ या १९८५ मध्ये आलेल्या चित्रपटातही न्यायालयातील दीर्घप्रसंग होते. वकिलाच्या भूमिकेत असलेला अनिल कपूर विषबाधेचा आरोप फेटाळण्यासाठी कोर्टात विष पितो, हे यातील दृश्य बरेच गाजले.

न्यायालयीन कामकाजाचे चित्र असलेला ‘दामिनी’ प्रेक्षकांच्या चिरकाळ स्मरणात राहणारा ठरला. आजही यातील सनी देओलने साकारलेली वकिलाची भूमिका प्रेक्षक विसरलेले नाहीत. विशेषत: ‘तारीख पे तारीख, तारीख पे तारीख’ हा त्याचा डायलॉग प्रचंड लोकप्रिय झाला. ‘जॉली एलएलबी’ या चित्रपटाने कॉमेडीच्या माध्यमातून गंभीर संदेश दिला आहे. यातील जॉली हा एका हाय प्रोफाईल हिट अँड रन प्रकरणात अडकतो आणि व्यवस्थेशी संघर्ष करतो. या चित्रपटाला फारसे यश मिळाले नसले तरी त्यानंतर चार वर्षांनी २०१७ मध्ये या चित्रपटाचा ‘जॉली एलएलबी-२’ नावाचा सिक्वेल बनवण्यात आला. यामध्ये एक गैर-गंभीर वकील जॉली (अक्षय कुमार) बनावट चकमक प्रकरणात अडकतो आणि लढतो. सौरभ शुक्लाने दोन्ही चित्रपटांमध्ये न्यायाधीशाच्या भूमिकेत जबरदस्त काम केले आहे. २०१२ मध्ये आलेला ‘ओह माय गॉड’ हा चित्रपट धर्माच्या नावाखाली समाजात पसरवलेल्या ढोंगीपणावर हल्ला करतो. नास्तिक कांजीचे (परेश रावल) दुकान भूकंपामुळे कोसळते आणि विमा कंपनी विम्याची रक्कम देण्यास नकार देते, त्याला ’देवाची कृती’ म्हणते. यानिमित्ताने देवाधर्माच्या नावावर चाललेल्या बाजारीकरणावर मार्मिक व उपरोधिक भाष्य करण्यात आले. हा चित्रपट तेलुगूमध्ये ‘गोपाला-गोपाला’ नावाने बनवला गेला. अब्बास-मस्तानच्या ‘ऐतराज’ या चित्रपटातील न्यायालयीन दृश्ये लोकप्रिय ठरली. यामध्ये प्रियांका चोप्राने नकारात्मक भूमिका साकारली होती. ती तिचा माजी प्रियकर अक्षय कुमारवर बलात्काराचा खोटा आरोप करते. त्यापासून बचाव करण्यासाठी अक्षयची पत्नी करीना कपूर पतीच्या बचावासाठी उभी राहते.

‘रुस्तम’ हा २०१६ मध्ये आलेला चित्रपट नौदल अधिका-याच्या जीवनातील एका सत्य घटनेवर आधारित होता. नौदल अधिकारी एका माणसाला गोळ्या घालून ठार करतो आणि स्वत:ला कायद्याच्या स्वाधीन करतो. ही हत्या कटाचा भाग म्हणून केली गेली होती की स्वसंरक्षणार्थ गोळी झाडली गेली होती, याचा पेच न्यायालयापुढे उभा राहतो. या चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी अक्षय कुमारला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. याच वर्षी प्रदर्शित झालेला ‘पिंक’ हा चित्रपट बलात्कारासारख्या संवेदनशील विषयावर बनवण्यात आला होता. यामध्ये अमिताभ यांनी वकिलाची भूमिका साकारली होती. ‘पिंक’ला सामाजिक विषयांवर बनवलेल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तामिळमध्ये ‘नेरकोंडा परवाई’ आणि तेलुगूमध्ये ‘वकील साब’ म्हणून त्याचा रिमेक करण्यात आला. अजय बहल दिग्दर्शित ‘आर्टिकल ३७५’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट कोर्टरूम ड्रामा चित्रपट देखील म्हटले जाते.काही वर्षांपूर्वी आलेला ‘मुल्क’ हाही कोर्टरूम ड्रामा होता. अनुभव सिन्हा यांचा हा चित्रपट ‘सर्व मुस्लिम दहशतवादी नसतात’ हा मुद्दा प्रकर्षाने मांडतो. यामध्ये तापसी पन्नू आणि आशुतोष राणा यांनी वकिलांची भूमिका साकारली होती.

मनोज बाजपेयी यांचा चित्रपट ‘सिर्फ एक बंदा काफी है’ हा न्यायालयीन कामकाजावर आधारित मनोरंजक चित्रपटांपैकी एक आहे. एका सत्य घटनेवर आधारित या चित्रपटात मनोज बाजपेयी यांनी वकील पीसी सोलंकी यांची भूमिका साकारली होती. ही एका वकिलाची कथा आहे जो एका मोठ्या धार्मिक नेत्याविरुद्ध एकट्याने खटला लढवून पीडितेला न्याय मिळवून देतो. याशिवाय ‘शौर्य’ हा चित्रपट के. के. मेनन यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी आणि सर्वोत्कृष्ट एकपात्री अभिनयासाठी लक्षात ठेवला जातो. याशिवाय वीर झारा, मेरा साया, नो वन किल्ड जेसिका, कोर्ट, सबसे बडा खिलाडी, दो भाई आणि क्यूंकी मै झूठ नहीं बोलता या चित्रपटांचे कथानक कोर्ट रूमवर आधारित होते. न्यायालयांमधील प्रसंगांमुळे चित्रपटांमधील मनोरंजनाला एक वेगळा आयाम मिळतो. कोर्टातील कामकाजाबाबत असणा-या उत्सुकतेमुळे त्याला लोकप्रियताही लाभते.

– सोनम परब

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR