नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांना सर्वोच्च न्यायालयाकडून धक्का बसला आहे. संजय सिंह यांना सध्या सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. न्यायालयाने खासदार संजय सिंह यांना अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सविस्तर सुनावणी ५ फेब्रुवारी निश्चित केली आहे.
दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ४ ऑक्टोबर रोजी संजय सिंग यांना अटक केली होती. ईडीने आरोप केला आहे की, संजय सिंग यांनी आता रद्द केलेल्या अबकारी धोरणाची निर्मिती आणि अंमलबजावणी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, ज्यामुळे काही मद्य उत्पादक, घाऊक विक्रेते आणि किरकोळ विक्रेते यांना फायदा झाला. मात्र, संजय सिंह यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.
ईडीने आरोप केला आहे की, आरोपी व्यापारी दिनेश अरोरा याने संजय सिंह यांच्या निवासस्थानी दोन हप्त्यांमध्ये २ कोटी रुपये रोख दिले होते. ईडीच्या म्हणण्यानुसार, अरोरा याने दोन वेळा सिंग यांच्या घरी २ कोटी रुपये रोख दिल्याचे तपासात समोर आले आहे. मात्र सिंग यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. दिल्लीवर राज्य करणाऱ्या ‘आप’ने आपल्या नेत्यांच्या अटकेला ‘राजकीय षडयंत्र’ म्हटले आहे.