पुणे : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यामुळे चोरट्यांनी तरुणाला कोयत्याचा धाक दाखवून १४ हजार रुपयांची रोकड लुटून नेली. तसेच, गुलटेकडी भागातील मीनाताई ठाकरे वसाहतीमध्ये दहशत निर्माण केल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत एका तरुणाने (वय २३, रा. धनकवडी) स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अमन शाकीर शेख (वय १९, रा. मीनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी) आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध रविवारी (ता. २१) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी तरुण हा मीनाताई ठाकरे वसाहतीमधील एकदिल मित्रमंडळाजवळ आला होता. त्यावेळी आरोपींनी त्याला अडवून दारू पिण्यासाठी पैसे मागितले. तरुणाने पैसे देण्यास नकार दिला. त्यावर आरोपींनी तरुणाला कोयत्याचा धाक दाखवून खिशातील १४ हजारांची रोकड काढून घेतली.
या घटनेचे मोबाइलमध्ये चित्रीकरण करताना आरोपींनी कोयत्याने तरुणाचा मोबाईल फोडला. त्याने आरडाओरडा केल्यानंतर नागरिक त्याच्या मदतीला धावून आले. त्यावेळी आरोपींनी नागरिकांवर कोयते उगारून परिसरात दहशत निर्माण केली.