परभणी : भक्त प्रल्हादाची जी भक्ती आहे तशीच भक्ती काँग्रेस जनांच्या आचार, विचार आणि उच्चारातून दिसत आहे. आपण काँग्रेस काँग्रेस म्हणत आहोत तर दुसरा रावणाचा छळणारा विचार आहे तो पक्षांतर करा म्हणतो, आमचेच बरोबर आहे हे सांगतो. भक्त प्रल्हादाच्या भक्तीने नृसिंहाचा अवतार झाला तसाच नृसिंह अवतार ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून होईल आणि राक्षसरूपी भाजपचे खलत्व नष्ट केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला.
सामाजिक सलोखा व सद्भाव वाढीस जावा यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली परभणीत आज सद्भावना पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आ. सतेज ऊर्फ बंटी पाटील, माजी मंत्री नितीन राऊत यांच्यासह अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव कुणाल चौधरी, खा. डॉ.कल्याण काळे, खा. रविंद्र चव्हाण, माजी मंत्री सुरेश वरपुडकर, रमेश बागवे, काँग्रेस सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, प्रदेश सरचिटणीस संघटन व प्रशासन ऍड. गणेश पाटील, माजी आ. मोहन जोशी, माजी खा. तुकाराम रेंगे पाटील, माजी आ. सुरेशदादा देशमुख, प्रदेश प्रतिनिधी एकनाथ मोरे, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख, अनुसुचित जाती विभागाचे अध्य सिद्धार्थ हत्तीअंबीरे, परभणी शहर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार, प्रदेश सरचिटणीस ब्रिज दत्त, रामचंद्र दळवी, रामभाऊ घाडगे, केदार सोळंके, भगवान वाघमारे, बाळासाहेब आकात, इरफान उर रहेमान, डॉ. जफर अहमद खान, मुजाहिद खान, केदार साळुंके, अभय देशमुख, सुहास पंडित, नदिम इनामदार, बालाजी चव्हाण, आनंद चव्हाण, ऍड. मुजाहेद, प्रा. यशपाल भिंगे, अनिल पटेल, बाळासाहेब रेंगे, शिवाजी बेले, धोंडीराम चव्हाण, अमोल जाधव, तुकाराम साठे, शमी अहमद खान, सुनील देशमुख, गुलमीर खान, गोविंद यादव, प्रल्हाद पारवे, अनिल घांडगे, बाबासाहेब आवचार, सुदर्शन कदम, विलास अप्पा देशमुख, व्यंकटेश काळे, अजय चव्हाण यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळी पोखर्णी येथे श्री नृसिंहाचे दर्शन घेऊन सद्भावना पदयात्रेची सुरुवात झाली. यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, राज्यात सामाजिक तेढ निर्माण करण्याचे काम केले जात आहे. परभणीतही अशाच एका घटनेने या भागात सामाजिक द्वेष पसरवण्याचा प्रकार झाला. राज्यातील सामाजिक तणाव कमी करण्याच्या हेतूने व सद्भावना आणि सौहार्द निर्माण करण्यासाठी ही काँग्रेस पक्षाने सद्भावना पदयात्रा आयोजित केली आहे. याआधी बीड जिल्ह्यात मस्साजोग ते बीड, नागपूर आणि नाशिकमध्ये सद्भावना पदयात्रा काढण्यात आली तर काल परळीत सद्भावना सत्याग्रह करण्यात आला आणि आज परभणीत सद्भावना यात्रा काढली असल्याचे सांगितले.
जनतेची लुबाडणूक : सतेज पाटील
विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गट नेते सतेज ऊर्फ बंटी पाटील म्हणाले की सत्ताधारी लोक राजकीय फायद्यासाठी सामाजिक वातावरण बिघडवत असताना काँग्रेस पक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्त्वाखाली सद्भावना व सौहार्द वाढवण्याचे काम करत आहे. जनतेला लुबाडून उद्योगपती आणि ठेकेदारांची घरे भरण्याचे काम सुरु आहे. ठेकेदारांच्या फायद्यासाठी शक्तीपीठ महामार्गाच्या निमित्ताने शेतक-यांच्या सुपीक जमिनी हडपण्याचा सरकारी डाव आहे पण काँग्रेस तो यशस्वी होऊ देणार नाही असा इशारा दिला.
आज संविधान संमेलन
सोमवार दि. ५ मे रोजी परभणी शहरात महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथली यांच्या प्रमुख उपस्थितीत संविधान बचाव यात्रा व अक्षता मंगल कार्यालयात संविधान संमेलन संपन्न होणार आहे.
वाकोडेंच्या कुटुंबियांची घेतली भेट
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आ. सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी आज परभणी येथे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूनंतर पुकारलेल्या आंदोलनात मृत्यू पावलेले आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते विजय वाकोडे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत माजी खा. प्रदेश उपाध्यक्ष तुकाराम रेंगे, परभणी शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष नदीम इमानदार, ऍड. मुजाहिद खान आदी उपस्थित होते.