सोलापूर : ठराविक जमातीमधील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना बाहेर काढण्यासाठी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या पहाट उपक्रमाची पाळेमुळे जिल्ह्यात घट्ट होत चालली आहेत. याचाच एक भाग म्हणून सोलापूर ग्रामीण जिल्हा पोलिस दलातील प्रत्येक पोलिस अधिका-याने ५ आणि पोलिस अमंलदारांना प्रत्येकी २ गुन्हेगार दत्तक देण्यात आले आहेत. हे पोलिस अधिकारी व अमंलदार हे दत्तक आरोपींच्या नियमित संपर्कात राहुन त्यांना गुन्हेगारी क्षेत्रातून बाहेर पडण्यास मदत करणार आहेत.
सप्टेंबर २०२४ मध्ये सोलापूरच्या पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी पहाट उपक्रम सुरु केला आहे. पोलिस ठाणेनिहाय वारंवार गुन्हे करणा-या लोकांची यादी तयार करण्यात आली असून त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना आवश्यक असणारा रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र, रेशन कार्ड, मतदान कार्ड, आधार कार्ड अशी मुलभूत कागदपत्रे काढून देण्यास मदत करण्यात आली आहे. त्यामध्ये ३२९ जणांना जन्म दाखला, १८५ जणांना जातीचा दाखला, २३५ जणांना आधारकार्ड, ८ जणांना अपंग दाखला, ४ जणांना घर बांधणी प्रस्ताव, ६ जणांना वाहन लायसन्स काढून देण्यात आले आहे. तसेच ३६ जणांना खासगी नोकरी तर १२ वस्त्यांवरती शेती प्रशिक्षण देण्यात आले आहे.
त्याची सुरुवात पोलिस अधिक्षक कुलकर्णी यांनी स्वत:पासून करीत त्यांनी स्वत: सोलापूर जिल्ह्यातील टॉपचे १० गुन्हेगार दत्तक घेतले. तर अप्पर पोलिस अधीक्षक व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक यांना प्रत्येकी १० गुन्हेगार, जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस अधिकारी यांना प्रत्येकी ५ व पोलिस अमंलदार यांना प्रत्येकी दोन गुन्हेगार दत्तक देण्यात आले आहेत. हे पोलिस अधिकारी व अमंलदार हे नियमित दत्तक आरोपीच्या संपर्कात राहुन त्यांना गुन्हेगारी क्षेत्रातून बाहेर पडण्यास मदत करणार आहेत. पोलिस मुख्यालयात पोलिस अधिक्षक कुलकर्णी यांनी दत्तक घेतलेल्या गुन्हेगारांशी संवाद साधला.
या गुन्हेगारांची कौटुंबिक पार्श्वभूमी, उदरनिर्वाहाची साधने याबाबत माहिती घेऊन त्यांना शासनाच्या एकात्मिक आदिवासी विकास महामंडळाच्या योजनांची माहिती देऊन त्यासाठी आवश्यक कागदपत्रासह प्रस्ताव तयार करण्यात येत असल्याचेही कुलकर्णी यांनी सांगितले. यावेळी सहायक सरकारी वकिल शैलजा क्यातम, विधी अधिकारी रामराजे देशमुख, पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी गुन्हेगार कायद्याच्या कचाट्यात कसा गुंतत जातो याची माहिती दिली, तर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहायक संचालक सरतापे यांनी शासनाच्या योजना मिळवून देण्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे सांगितले.