मुंबई : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आरोप आणि टिकेचा चक्रव्यूहात अडकलेल्या धनंजय मुंडे यांच्यावर मंगळवार दि. ४ फेब्रुवारी रोजी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले असून धनंजय मुंडे कृषिमंत्री असताना बाजारभावापेक्षा अधिक दराने ५ वस्तूंची खरेदी करण्यात आली. यात पावणेतीनशे कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करताना, आता तरी त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी अशी मागणी त्यांनी केली आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराड यांचा कथित सहभाग, त्यांना राजाश्रय दिल्याचा आरोप यामुळे धनंजय मुंडे आधीच अडचणीत आहेत. त्यातच कृषिखात्याचे मंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात ५ वस्तूंच्या खरेदीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आज अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेत केला. धनंजय मुंडे यांच्या कृषीमंत्री असताना काही वस्तू शेतक-यांना देण्यात येणा-या थेट अनुदानाच्या यादीतून वगळल्या.
नॅनो युरिआ, नॅनो डीएपी, बॅट्री स्पेअर, मेटाल्डे हाईट आणि कापूस बॅगा यांच्या खरेदीत या काळात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला. नॅनो युरिया आणि नॅनो डीएपीची निर्मिती इस्को नावाची कंपनी करते. नॅनो युरिआची ५०० मिलीमीटरची बाटली खुल्या बाजारात ९२ रुपयांना विकत मिळते. पण धनंजय मुंडे यांच्या काळात हीच बॉटल २२० रुपयांना खरेदी करण्याचे टेंडर काढण्यात आले. त्यावेळी कृषी खात्याने जवळपास २० लाख बाटल्या खरेदी केल्या. नॅनो डीएपची २६९ रुपये किमतीची बाटली ५९० रुपये दराने खरेदी करण्यात आली.
तर बॅटरी स्प्रेअरचा बाजारभाव २४९६ रुपये असताना कृषी खात्याने एक स्प्रेअर ३४२५ रुपयांना विकत घेतला. गोगलगायीचा प्रादूर्भाव झाल्याने कापूस आणि सोयीबीनचे नुकसान होते. मेटाल्डे हाइड हे पीआयए कंपनीचे पेटेंटेड उत्पादन आहे. हे उत्पादन बल्कमध्ये घेतल्यावर स्वस्त मिळते. रिटेलमध्ये आता या उत्पादनाचे दर ८१७ रुपयाला आहे. पण कृषी मंत्री मुंडेंनी १२७५ रुपयाला विकत घेतले. ६ लाख १८ हजार कॉटन स्टोरेज बॅग घेतल्या. काही दिवसापूर्वी आयसीएआय नावाची संघटना आहे. त्यांनी ५७७ रुपयाला बॅगा घेतल्या. पण मुंडेंच्या कृषी खात्याने टेंडरच्या माध्यमातून १२५० रुपयाला याच बॅगा घेतल्या व ३४२ कोटीच्या टेंडरमध्ये १६० कोटी रुपये जास्त दिले गेले. या माध्यमातून प्रचंड मोठा आर्थिक घोटाळा करण्यात आल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला.
आपण दिलेले खुल्या बाजारातील दर किरकोळ विक्रीचे आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते तेव्हा घाऊक दराने म्हणजे आणखी कमी किमतीत या वस्तू मिळायला हव्या होत्या. याचाच अर्थ जवळपास सत्तर टक्के वाढीव किंमत देऊन मोठ्या प्रमाणात घोटाळा करण्यात आल्याचा आरोप दमानिया यांनी केला.
केंद्र सरकारने २०१६ साली शेतक-यांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे देण्याचे आदेश काढले होते. राज्य सरकारला हे आदेश बंधनकारक होते. मात्र धनंजय मुंडे यांच्या कृषीखात्याने या आदेशाला बगल देत शेतीसंबंधित उपकरणे आणि खतांची खरेदी करताना सर्व नियम धाब्यावर बसवले. शेतक-यांच्या खात्यात थेट पैसे हस्तांतरित न करता अनेक वस्तू बाजारपेठेतून खरेदी केल्या. त्यासाठी बाजारभावाच्या दुप्पट पैसे मोजण्यात आले, असा आरोप अंजली दमानिया यांनी केला.
तत्कालीन कृषी आयुक्त प्रवीण गेडाम यांनी अशी खरेदी करणे चुकीचे ठरेल असे निदर्शनास आणून दिले होते. मात्र धनंजय मुंडे यांनी अजित पवारांची आणि त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंडे यांनी सुचवलेले घटक डीबीटीच्या यादीतून वगळण्याची परवानगी दिली. मुळात मुख्यमंत्र्यांना तसा अधिकारच नव्हता. पण अजित पवारांची सही पाहून एकनाथ शिंदे यांनी सही केली असावी असे अंजली दमानिया म्हणाल्या. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी. तसेच शेतक-यांचे पैसे हाडप करणा-यांवर कारवाई करावी, अशी मागणी करताना, एवढे पुरावे दिल्यानंतर तरी मुख्यमंत्री फडणवीस धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार की नाही ? असा सवाल अंजली दमानिया यांनी केला.
दमानियांवर कायदेशीर कारवाई करणार : मुंडे
अंजली दमानिया यांनी कागदपत्रांसह गंभीर आरोप केल्यानंतर धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन हे आरोप फेटाळले. अंजली दमानिया यांना बेफाम आरोप करून सनसनाटी निर्माण करण्याची सवय आहे. आजवर त्यांनी अनेकांवर असे आरोप केले आहेत. मात्र त्यांनी केलेले सर्व आरोप धांदात खोटे आहेत. अंजली दमानिया यांना माझ्यावर आरोप करण्याचे काम ज्यांनी कोणी दिले असेल त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. अंजली दमानिया या खरेतर बदनामिया आहेत, असा पलटवार धनंजय मुंडे यांनी केला.
कृषी खात्याने नियमानुसार व पारदर्शक पद्धतीने निविदा काढून खरेदी केली आहे. पण गेल्या ५८ दिवसांपासून माझ्यावर मीडिया ट्रायल सुरु आहे. हा मीडिया ट्रायल का सुरु आहे? कोण चालवत आहे? हे मला माहिती नाही. मुख्यमंत्र्यांना अधिकार आहेत की नाही ? हे त्यांना माहीत नाही का? अंजली दमानिया यांना विचारून खरेदी करायची का? असा सवाल त्यांनी केला.
मी पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छितो की, कृषी विभागातील तत्कालीन खरेदी प्रक्रिया नियमातील तरतुदीनुसार व मुख्यमंत्री महोदयांच्या अंतिम मान्यतेनंतरच झाली आहे, त्यानंतरच पुढील कारवाई सुरु झाली. यांसह इतर अनेक मोघम आरोप करणा-या दमानिया ताई यांच्यावर मी लवकरच फौजदारी अब्रु नुकसानीचा खटला मुंबई उच्च न्यायालयात दाखल करणार आहे असे धनंजय मुंडे यांनी समाजमाध्यामावर पोस्ट करून जाहीर केले आहे.
मामीची जमीनही बळकावली : दमानिया
धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर अंजली दमानिया यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन आरोपांचा पुनरुच्चार केला. कृषी खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी काम केले असते तर त्यांना खात्यात काय सुरू आहे याची माहिती त्यांना झाली असती. पण त्यांनी बीडमध्ये दादागिरी आणि जमिनी लाटण्याचे काम करत होते. त्यांनी त्यांच्या मामींच्या जमिनीही लाटल्याचा टोला अंजली दमानिया यांनी लगावला.