मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या वर्षी दावोस दौ-यावर चाळीस खोक्यांचा खर्च केला होता, पण त्यातून काही निष्पन्न झालेले नाही. आत्ताही ५० लोकांचे शिष्टमंडळ घेऊन दावोसला गेले होते, किती गुंतवणूक आणली ? व्हायब्रंट गुजरात मध्ये २६ लाख कोटींची गुंतवणूक आली. तामिळनाडूने सहा लाख कोटींची गुंतवणूक आणली महाराष्ट्राला काय मिळाले ? असा सवाल करत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौ-यावर आज जोरदार टीका केली.
दावोसमध्ये जागतिक आर्थिक परिषदेत ३ लाख ५३ हजार कोटींचे सामंज्य करार झाले असून, दीड लाखांपेक्षा जास्त एमओयूला स्वीकृती मिळाल्याची माहिती मुख्यमंर्त्यांनी दिली. परंतु ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मात्र याबाबत शंका व्यक्त करताना दौ-यावर जोरदार टीका केली. घटनाबा मुख्यमंत्री परदेशी दौरा करून परतले आहेत, मागच्या वर्षीच्या तुलनेत परदेशी दौ-यावर यंदा खूप मोठा खर्च झालेला आहे आणि काम शून्य झालेलं आहे. कारण त्यांची कार्यक्षमताच नाही आहे. जे करार केले त्यातील काही करार आधीच झाले होते. पण त्याचे पुढे काहीही झाले नाही. चंद्रपूर येथे वीस हजार कोटींचा प्रकल्प येणार होता, पण त्याचं पुढे काय झालं हे माहित नाही.
परदेशी डेटा सेंटर कंपनी बारा हजार कोटींची गुंतवणूक करणार होती, हँड्स इन्फ्रा चार हजार कोटी, रत्नागिरीत बारा हजार कोटींचा प्रकल्प येणार होता, आणखी एक सोळाशे कोटींचा प्रकल्प येणार होता, पण त्याचे पुढे काय झाले कोणालाच माहित नाही. फोटो दाखवणे, व्हाईट पेपर, ब्लॅक पेपरकिंवा वेगवेगळ्या रंगाचे पेपर नको. प्रकल्पाचे काम कुठपर्यंत पोहचले आहे हे तुम्हाला दाखवावे लागले,असे आदित्य ठाकरे म्हणाले. वेदांतासारखा प्रकल्प राज्यातून बाहेर गेला तेव्हा यापेक्षा मोठा प्रकल्प आणू असे सांगितले गेले. पण अजून कोणताही प्रकल्प आलेला नसल्याची टीका त्यांनी केली.
मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौ-यावर ५० लोक सोबत होते. मी टीका केल्यावर अनेक लोक स्वखर्चाने जाणार असल्याचे सांगितले.स्वखर्चाने दावोसला जाणारे कोणकोण आहेत, त्यांनी परराष्ट्र खात्यांची परवानगी घेतली होती का? दावोसला जाऊन त्यांनी काय केले हे सरकारने जाहीर करावे, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली. तेथे जाऊन बर्फात खेळण्यासाठी गेला होता, की तिथले डोंगर आणि झाडी बघायची होती ? असा बोचरा सवाल त्यांनी केला.