उदगीर : प्रतिनिधी
सध्या सकाळी थंडी दुपारी ऊन तर अधूनमधून होत असलेल्या अवकाळी पावसामुळे वातावरणात झालेल्या बदलामुळे साथीच्या आजाराने उदगीर तालुक्यात डोके वर काढले आहे. उदगीर येथील उपजिल्हा रुग्णालयासह खाजगी रुग्णालयात उपचारासाठी ताप खोकला सर्दीच्या रुग्णात वाढ होताना दिसत आहे. वातावरणामध्ये बदल झाला की नागरिकांना सर्दी खोकला होत आहे. सध्या सकाळी हिवाळा जाणवत आहे तर दुपारी उन्हाळा जाणवत आहे तर मध्येच पावसाचे चार थेंब पडत असल्याने पावसाळाही जाणवत आहे. सध्या पावसाचा नियम नसल्याने कधीही पाऊस पडत आहे. सध्या हिवाळा सुरू असल्याने रात्री व पहाटे आणि सकाळी थंडीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
दुपारी बाहेर पडल्यावर उन्हाचा असर दिसत आहे. थंड व गरम या दोन्हीही बदलामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या अनेक समस्या सतावत आहेत. लहान मुलांना वृद्ध नागरिकांना सर्दी ताप खोकला होत असून उपचारासाठी उदगीर शहरातील खाजगी व शासकीय रुग्णालयात दररोज गर्दी वाढत आहे. उदगीर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणा-या रुग्णांची संख्या ही नेहमीच मोठ्या प्रमाणात असते. ग्रामीण भागातील श्रमिक आरोग्य केंद्रात सुद्धा दिवसान दिवस ओपीडीची संख्या वाढत आहे. ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रात सध्या दिवसाला १०० ते १५० रुग्ण उपचारासाठी येत आहेत. तर शहरी भागातील नागरिक व रुग्ण उपचार घेत आहे. वातावरण बदलामुळे नागरिकांना ताप सर्दी खोकला अंगावर न काढता तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन वैद्यकीय अधिकारी यांचा सल्ला घेऊन उपचार करण्याचे आव्हान उदगीर तालुका अधिकारी डॉक्टर प्रशांत कापसे यांनी केले आहे.