नवी मुंबई : मसाल्याच्या पदार्थांबरोबर सर्वसामान्यांच्या भाजीतील महत्त्वाचा घटक असलेल्या लसणाची राज्यभर टंचाई निर्माण झाली आहे. टंचाईमुळे मुंबई बाजार समितीमध्ये ११० ते १८० रुपये किलो दराने लसणाची विक्री होत आहे. पुण्यामध्ये होलसेल बाजारात हेच दर १०० ते २७० रुपयांवर आहेत. किरकोळ बाजारात लसूण २५० ते ३२५ रुपयांवर पोहोचला आहे. पुढील महिनाभर तेजी कायम राहणार आहे. मुंबई बाजार समितीमध्ये सोमवारी १४९ टन लसणाची आवक झाली. मध्य प्रदेश, राजस्थान व गुजरातवरून आवक सुरू आहे.
देशात लसणाचे सर्वाधिक उत्पादन मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, ओडिशा, पंजाब, आसाम, उत्तर प्रदेशमध्ये होते. महाराष्ट्रात पुणे, नाशिक, धुळे, अहमदनगर, जळगाव, सातारा परिसरात लसणाचे उत्पादन घेतले जाते.
नवीन हंगाम सुरू होईपर्यंत तेजी
जानेवारी, फेब्रुवारीमध्ये लसणाचा नवीन हंगाम सुरू होतो. लसणाचा साठा कमी झाल्यामुळे बाजारभाव वाढण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील सर्वच बाजार समितींमध्ये लसणाला विक्रमी भाव मिळत आहे. लसणाचा नवीन हंगाम सुरू होईपर्यंत तेजी कायम राहणार आहे.
जिरे, हळद, तिखट महागले
लसणा पाठोपाठ मसाल्याचे दरही वाढले आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा २५ टक्के दरवाढ झाली आहे. हळद, जिरे, धणे, लवंग, बडीसोप, लाल तिखटाच्या भावातही वाढ झाली. नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने मसाले, मिरचीच्या उत्पादनावर परिणाम झाल्याने दर वाढले आहेत. नव्या मालाची आवक झाल्यावर भाव कमी होतील.
आल्याचे दर चढेच
यंदाच्या उन्हाळ्यात आल्याचे भाव कडाडले असून, ५० ते ६० रुपये पावशेर आणि किलोसाठी १८० ते २२० रुपये मोजावे लागत आहेत. रोजच्या जीवनात लागणा-या आल्याचे भावही कमी होण्याचे नाव घेत नाहीत.