28.1 C
Latur
Thursday, July 4, 2024
Homeमहाराष्ट्रनाशिक विधान परिषदेत मतदानापूर्वीच राडा

नाशिक विधान परिषदेत मतदानापूर्वीच राडा

येवल्यात पैशाचे पाकिटे जप्त; दोघे ताब्यात

नाशिक : प्रतिनिधी
विधान परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. राज्यातील ४ विधान परिषद मतदारसंघात निवडणूक होत असून नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी उद्या मतदान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून मतदानाची तयारी सुरू असून राजकीय नेतेमंडळी गाठीभेटी व प्रचारात दंग आहेत. दरम्यान, येवल्यात मतदारांना पैसे वाटप करताना पोलिसांनी उमेदवार विवेक कोल्हे यांच्या समर्थकांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे, जिल्ह्यात राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी अवघे काही तास उरले असताना नाशिकच्या येवल्यात शिक्षकांना मतदानासाठी पैसे वाटप करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. निवडणूक विभागाचे अधिकारी तसेच पोलिसांनी विठ्ठल नगर परिसरात मतदारांना ५ हजार रुपयांचे पॉकेट देताना कोल्हेंच्या समर्थकांना पकडले आहे. विशेष म्हणजे यावेळी पोलिस देखील उपस्थित होते. पैसे वाटप करणा-यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून येवला शहर पोलिस ठाण्यामध्ये त्यांच्यावर पुढील कारवाई सुरू आहे. पैसे वाटप करणारे कार्यकर्ते हे उमेदवार विवेक कोल्हे यांचे कार्यकर्ते असल्याचे बोलले जात आहे.

२ जण ताब्यात, चौकशी सुरू
शिक्षक मतदार संघाची उद्या निवडणूक होत असून निवडणुकीपूर्वी पोलिस आणि तहसील विभागाच्या पथकाने मनमाडला मोठी कारवाई केली आहे. मतदारांना देण्यासाठी तयार करण्यात आलेले पैशांची पाकिटे पोलिसांनी जप्त केले आहे. गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी गणेश नगर भागात छापा मारून पैसे असलेली पाकिटे जप्त केली आहेत. या पाकिटांसोबत उमेदवार विवेक कोल्हे यांचे पॉम्प्लेटही आढळून आली आहेत. याप्रकरणी, दोन जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे.

सुषमा अंधारेंनीही केला आरोप
नाशिकची निवडणूक अनेक कारणांनी चर्चेत आली आहे. येथील मतदारसंघात शिंदे गटाने पैसेवाटप केल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. तर, महिला मतदारांना नथ आणि पुरुष मतदारांना कपडे वाटत असल्याचा दावा शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी केला होता. याबाबत त्यांनी निवडणूक आयोगात तक्रारही दिली आहे.

नाशिकमध्ये चौरंगी लढत
नाशिक शिक्षक मतदार संघात महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे महेंद्र भावसार निवडणुकीच्या रिंगणात असल्याने महायुतीत बिघाडी झाल्याचे चित्र आहे. महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाने संदीप गुळवे यांना उमेदवारी दिली आहे. तर विवेक कोल्हे हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत. नाशिकच्या चौरंगी लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून या निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR