पुणे : राज्यातील अनेक कलाकेंद्रांमध्ये डान्स बार व डीजे सुरू असल्याचा गंभीर आरोप लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी केला आहे. त्यांनी यासंबंधी एक व्हिडिओ पुरावा दाखवला असून त्यात विविध कला केंद्रांत सुरू असलेला धिंगाणा दिसून येत आहे.
सुरेखा पुणेकर यांनी शुक्रवारी येथे एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी वरील आरोप केला. त्या म्हणाल्या, महाराष्ट्रात डान्स बारवर बंदी आहे. पण त्यानंतरही अनेक सांस्कृतिक कला केंद्रांमध्ये खुलेआमपणे डान्स बार व डीजे सुरू आहे. राज्यातील ८२ पैकी ४२ कलाकेंद्रांत हा प्रकार सुरू आहे. या डान्स बारवर तत्काळ बंदी घालण्यात यावी. यामुळे अनेक संगीतकार, कलाकार व वाजंत्री हे देशोधडीला लागले आहेत.
सुरेखा पुणेकर यांनी आपल्या आरोपांची पुष्टी करताना एक व्हीडीओही दाखवला. त्यात ३ ते ४ महिला साडी नेसून डान्स करताना दिसून येत आहेत. त्या डीजेच्या तालावर डान्स करत असून काही तरूण त्यांच्यावर पैसे उधळताना दिसून येत आहेत. ते त्यांच्याशी अश्लिल चाळे करतानाही दिसून येत आहेत. सुरेखा पुणेकर यांनी शेअर केलेला हा व्हीडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ज्या पार्ट्यांना शासनाने नियमावली लायसन्स असेल तरच त्या पार्ट्यांना कला केंद्रांमध्ये प्रवेश दिला जातो.
कलाकेंद्रांच्या नियमांमध्ये स्टेज परफॉरमन्स करताना कलाकारांची वेशभुषा कशी असावी. नृत्यांगना आणि गायिका नऊवारी साडीमध्ये असावी. नृत्यांगनाचे वय १८ वर्षे पूर्ण असावे, अशाच नृत्यांगनाना पार्टीमध्ये प्रवेश दिला जातो.
राज्यात ६२ लोकनाट्य कलाकेंद्र
राज्यात ६२ लोकनाट्य कला केंद्र आहेत. या कला केंद्रांना लायसन्स दिले आहेत. यामधील २० कला केंद्रांना नियमावली लायसन्स दिले आहेत. यानुसारच पेटी, तबला, ढोलकी, घुंगरू, नृत्यांगना आणि सोंगाड्या, गायिका या कलाकेंद्रामध्ये चालू आहेत. राज्यातील ३८ कला केंद्रामध्ये डीजे सुरू आहे.
सुरेखा पुणेकर राजकारणात
उल्लेखनीय बाब म्हणजे प्रसिद्ध लोककलावंत अशी ओळख असलेल्या सुरेखा पुणेकर यांनी लावणीला जनमाणसांत रुजवण्याचे काम केले. त्यांनी वयाच्या ८ व्या वर्षी पारावच्या तमाशापासून लोककलेल्या क्षेत्रात पाऊल ठेवले. चंद्रकांत ढवळपुरीकर यांच्या फडात त्यांनी काम केले. या क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानामुळे लावणी म्हणजे सुरेखा पुणेकर असे समीकरण तयार झाले. त्यांनी आता राजकारणातही प्रवेश केला आहे. सध्या त्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय आहेत.