21.2 C
Latur
Sunday, December 29, 2024
Homeराष्ट्रीयबाबांच्या निधनानंतर सीडब्ल्यूसीने शोकसभादेखील बोलावली नाही

बाबांच्या निधनानंतर सीडब्ल्यूसीने शोकसभादेखील बोलावली नाही

प्रणव मुखर्जींच्या मुलीने व्यक्त केली नाराजी

नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली आहे. अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या वेगळ्या स्मारकाचा ठेवलेल्या प्रस्तावावर प्रश्न उपस्थित केला, डॉ.मनमोहन सिंग यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी गुरुवारी रात्री दिल्लीतील एम्समध्ये निधन झाले.

शर्मिष्ठा मुखर्जी यांनी एक्सवर दिलेल्या निवेदनात असा दावा केला आहे की, ऑगस्ट २०२० मध्ये माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन झाले. तेव्हा काँग्रेस नेत्यांनी सीडब्ल्यूसीची शोकसभा बोलावण्याची तसदी घेतली नाही. या मुद्यावरून काँग्रेस नेतृत्वाने आपली दिशाभूल केल्याचा आरोपही त्यांनी केला होता.

काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने त्यांना सांगितले होते की, भारतीय राष्ट्रपतींसाठी असे होत नाही. या दाव्याला बकवास असल्याचे सांगत शर्मिष्ठा यांनी दावा केला की, वडिलांच्या डायरीतून समजले की माजी राष्ट्रपती के.आर. नारायणन यांच्या निधनावर सीडब्ल्यूसीची बैठक बोलावण्यात आली होती आणि शोकसंदेश स्वत: प्रणव मुखर्जी यांनी लिहिला होता. शर्मिष्ठा सी.आर. केशवन यांच्या पोस्टचाही हवाला देण्यात आला होता, ज्यात गांधी घराण्यातील नसलेल्या नेत्यांकडे काँग्रेसने कसे दुर्लक्ष केले हे सांगितले होते.

या संदर्भात मनमोहन सिंग यांचे माजी माध्यम सल्लागार आणि द अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टरचे लेखक डॉ. संजय बारू यांच्या पुस्तकातील एका प्रकरणाचाही उल्लेख करण्यात आला होता, यामध्ये काँग्रेसने माजी पंतप्रधानांना कसा न्याय दिला हे सांगण्यात आले होते. मंत्री पी.व्ही. नरसिंह राव यांचे २००४ मध्ये निधन झाले. त्यांच्यासाठी दिल्लीत कोणतेही स्मारक बांधले गेले नाही. २००४ ते २०१४ पर्यंत सत्तेत असूनही काँग्रेसने राव यांचे स्मारक बांधले नाही असेही या पुस्तकात लिहिले आहे. राव यांचे अन्त्यसंस्कार दिल्लीत नव्हे तर त्यांच्या मूळ गावी हैदराबादमध्ये व्हावेत, अशी काँग्रेसची इच्छा असल्याचा दावाही बारू यांनी केला होता.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून त्यांच्यासाठी स्वतंत्र स्मारकाची मागणी केली. तेव्हा हा संपूर्ण वाद सुरू झाला. यावर शर्मिष्ठा मुखर्जी यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर नाराजी व्यक्त केली. माजी राष्ट्रपती असलेल्या त्यांच्या वडिलांच्या निधनाबद्दल काँग्रेसने सीडब्ल्यूसीची शोकसभाही कशी बोलावली नाही याची आठवण त्यांनी सांगितली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR