चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील तब्बल ३.७० कोटी रुपयांवर सायबर गुन्हेगारांनी डल्ला मारण्याचा प्रकार पुढे आला आहे. सायबर गुन्हेगारांनी ७ ते १० फेब्रुवारीदरम्यान अनेक व्यवहारांमध्ये दिल्ली आणि नोएडा येथील खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर केले आहेत. सुटीच्या दिवशी हा प्रताप केला असावा, अशी शंका बँकेचे सीईओ राजेश्वर कल्याणकर यांनी व्यक्त केली आहे.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून आरटीजीएसद्वारे हस्तांतरित केलेली रक्कम नागपूर येथील येस बँकेमार्फत लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाते.
त्याचप्रमाणे, ७ आणि १० फेब्रुवारी या दोन दिवसांत ३४ खातेदारांच्या खात्यांमधून आरटीजीएसद्वारे ही रक्कम हस्तांतरित झाली. तथापि, हस्तांतरित रक्कम संबंधित खात्यांमध्ये जमा झाली नाही. त्यामुळे संशय निर्माण झाला. ३.७० कोटी रुपये मूळ खात्यात जमा होण्याऐवजी इतरत्र हस्तांतरित झाल्याचे पुढे आले.