नवी दिल्ली : दरवर्षीप्रमाणे याही वेळी नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने (एनसीआरबी) आपली आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीत नोंदवलेल्या गुन्ह्यांमध्ये घट झाली असली तरी महिलांवरील गुन्ह्यांमध्ये कोणतीही घट झालेली नाही. विविध कारणांमुळे आत्महत्या करणाऱ्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. तसेच देशात सायबर क्राइम एक नवीन आव्हान बनले आहे. सायबर गुन्ह्यांमध्येही झपाट्याने वाढ होत आहे. सरकारकडून देशाच्या विविध भागात सायबर पोलीस स्टेशन उघडून लोकांना या गुन्ह्यांची माहिती दिली जात असली तरी गुन्ह्यांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.
देशभरात २०२२ मध्ये सायबर गुन्ह्यांचे ६५८९३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर २०२१ मध्ये देशभरात सायबर गुन्ह्यांशी संबंधित ५२९७४ गुन्हे नोंदविले गेले होते. म्हणजे एका वर्षात सायबर गुन्ह्यात २४.४ टाक्यांची वाढ झाली आहे. यातील सुमारे ६५ टक्के प्रकरणे फसवणुकीचे आहेत. म्हणजे ६५८९३ प्रकरणांपैकी ४२७१० गुन्हे फसवणुकीचे आहेत. तर ३६४८ गुन्हे खंडणीचे आहेत. सायबर गुन्ह्यांवर कारवाई करण्यासाठी अनेक ठिकाणी सायबर गुन्ह्यांसाठी स्वतंत्र युनिट्स तयार करण्यात आली आहेत. राजधानी दिल्लीत प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र सायबर पोलीस स्टेशन उघडण्यात आले आहेत. याशिवाय विशेष सेलचे आयएफएसओ युनिट तज्ञ प्रकरणांची चौकशी करते.