मुंबई : चक्रीवादळ दानाचा परिणाम आता दिसू लागला आहे, आज रात्री उशिरा हे चक्रीवादळ ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या या चक्रीवादळाचा परिणाम मोठ्या प्रमाणात पश्चिम बंगालवर देखील होणार आहे. तासी ११० ते १२० किलोमीटर वेगाने हे वादळ ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. या वादळाच्या पार्श्वभीवर ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये हवामान खात्याकडून हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.
दाना चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जवळपास पाचशे ट्रेन रद्द करण्यात आल्या असून, पुढील १६ तास या भागांमधील विमानांची उड्डाणेदेखील रद्द करण्यात आली आहेत. एनडीआरएफची पथकही तैनात करण्यात आली आहेत. दाना चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. ओडिशा आणि पश्चिम बंगाल या दोन राज्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस होणार असून, हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात देखील पुढील २४ तासांमध्ये वादळी वा-यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात पावसाची शक्यता असून, वादळी वा-यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार आहे.