26.3 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeराष्ट्रीयदक्षिणेत चक्रीवादळ, उत्तरेत गारठा

दक्षिणेत चक्रीवादळ, उत्तरेत गारठा

पुडुचेरीनजीक ‘फेंगल’ धडकल्याने मुसळधार पाऊस रस्ते, हवाई वाहतूक विस्कळीत

चेन्नई/पुडुचेरी : फेंगल चक्रीवादळ शनिवारी रात्री उशिरा पुडुचेरीनजिक धडकले. या पार्श्वभूमीवर तामिळनाडूतील उत्तर भागात व पुडुचेरी येथे शनिवारी वादळी वा-यासह मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे त्या भागातील रस्ते तसेच हवाईमार्गे होणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. चेन्नईत विमान वाहतूक रविवार सकाळपर्यंत स्थगित केली आहे. या चक्रीवादळामुळे मोठे नुकसान होऊ नये म्हणून किनारपट्टीवरील काही हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले होते.

पुडुचेरीच्या किनारपट्टी भागात फेंगल वादळ धडकले तरीही यात मोठे नुकसान झाले नाही. पुडुचेरी व तामिळनाडूच्या किनारपट्टी भागातील हजारो लोकांना सुरक्षितस्थळी हलविले होते. वादळाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडू तसेच पुडुचेरी येथील प्रशासनाने लोकांना सतर्क राहण्याची सूचना केली होती.

सतर्कतेचा इशारा
वादळ धडकणार असल्याने कोणीही समुद्रकिना-यावर जाऊ नये, असा इशारा देण्यात आला होता. मात्र, अनेक लोकांनी त्याचे पालन केले नाही. मोठे नुकसान होण्यापासून टाळण्यासाठी आपत्ती निवारण यंत्रणेने पूर्वतयारी केली होती. त्याची मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी पाहणी केली. नुकसान सोसावे लागू नये, यासाठी काही हजार लोकांची निवारा केंद्रात व्यवस्था केली आहे.

अनेक भागांत पाणी
चेन्नई महापालिकेचे काही हजार कर्मचारी, अभियंते वादळाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज होते. राज्यातील विविध भागांत मुसळधार पावसाने साचलेल्या पाण्याचा १६८६ मोटरपंपांच्या सहाय्याने निचरा करण्यात येत होता. फेंगल चक्रीवादळ धडकण्याच्या शक्यतेमुळे तामिळनाडू सरकारने सतर्कता बाळगत चेन्नईतील शाळा, महाविद्यालयांना ३० नोव्हेंबर रोजी सुटी जाहीर केली होती.

मध्य प्रदेशात विक्रमी थंडी
मध्य प्रदेशात रात्रीचे तापमान प्रचंड उतरले आहे. चोवीस तासांत सर्वात कमी ६.८ अंश तापमान मंडला येथे नोंदले गेले. हे तापमान थंड हवेचे ठिकाण असलेल्या मनालीपेक्षाही कमी होते. उत्तर भारतातून येणा-या थंड वा-यांमुळे थंडीत वाढ झाली असल्याचे हवामान खात्याच्या सूत्रांनी सांगितले. येत्या दोन-तीन दिवस थंडीचा हा प्रकोप राहू शकतो.

काश्मिरात पारा शून्याजवळ
काश्मीरमध्ये बहुतांश भागांत पारा शून्याच्या वर असला तरी उंच भागांत बर्फवृष्टी झाली. पहलगाममध्येही बर्फवृष्टी झाली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार काश्मीर खो-यात २ डिसेंबरपासून दोन दिवस हलका पाऊस आणि बर्फवृष्टी होईल. संपूर्ण काश्मीरमध्ये ढगाळ वातावरणामुळे काही ठिकाणी पारा शून्याच्या खाली होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR