कोलकाता : दक्षिण अंदमान समुद्र आणि लगतच्या भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. ते पुढे तामिळनाडू-ओडिशाच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. त्यानंतर शुक्रवारी १ डिसेंबर दरम्यान बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची निर्मिती होऊन, ते तीव्र होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, तमिळनाडू, ओडिशा आणि आंध्र प्रदेशात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे. पुणे आयएमडीचे प्रमुख डॉ. के. एस होसाळीकर यांनी देखील ट्विटरवरून या संदर्भातील माहिती दिली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, सोमवारपासून दक्षिण अंदमान समुद्र आणि लगतच्या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र हळू हळू ईशान्येकडील दिशेने सरकेल आणि बुधवारी २९ नोव्हेंबरपर्यंत आग्नेय बंगालच्या उपसागरात दबावात बदलू शकते. त्यानंतर पुढील ४८ तासांत नैऋत्य बंगालच्या उपसागरात हे चक्रीवादळ आणखी तीव्र होईल. या चक्रीवादळाला ‘मिचॉन्ग’ असे नाव देण्यात आले आहे.
गेल्या महिन्यात २१ ऑक्टोबर रोजी ईशान्य मान्सून सुरू झाल्यानंतर बंगालच्या उपसागरात ‘हमून’ चक्रीवादळ तयार झाले आणि ते बांगलादेशकडे सरकले. याच महिन्यात ‘मिथिली’ चक्रीवादळ बांगलादेशच्या किनारपट्टीवर धडकले. दोन्ही वादळे पुढे सरकली नसल्याने कोणत्याही ठिकाणी पावसाचीही नोंद झाली नाही. दरम्यान, बंगालच्या उपसागरात सोमवारपासून (दि.२७) नवीन दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे, हे शुक्रवारी १ डिसेंबर रोजी चक्रीवादळात तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढे ‘मिचॉन्ग’ हे चक्रीवादळ मंगळवारी, ५ डिसेंबर रोजी आंध्रप्रदेश आणि दक्षिण ओडिशा किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आह, असेही हवामान विभागाने दिलेल्या माहितीत म्हटले आहे.