मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज भरायच्या शेवटच्या क्षणापर्यंत राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळाल्या.
बोरिवली मतदारसंघात भाजपाने घोषित केलेल्या उमेदवाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत गोपाळ शेट्टी यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. यावेळेस भाजपा कार्यकर्ते आणि गोपाळ शेट्टी समर्थक आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. अर्ज भरण्याच्या ठिकाणी भाजपाचेच कार्यकर्ते एकमेकांसमोर आल्याने तणाव निर्माण झाला होता.
बोरिवलीत स्थानिक उमेदवार न दिल्याने गोपाळ शेट्टी यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती. तसेच अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरण्याचे निक्षून सांगितले होते. यानंतर भाजपा नेत्यांनी गोपाळ शेट्टी यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याचा काही उपयोग झाला नाही. बोरिवलीच्या सन्मानासाठी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे. बोरिवली ही काही धर्मशाळा नाही. बोरिवलीत नेहमी बाहेरचा उमेदवार दिला जातो. हा माझा व बोरिवलीकर मतदारांचा अपमान आहे. कोणालाही विश्वासात न घेता बोरिवलीतून उमेदवारी दिली जाते हे पक्षासाठी घातक आहे, अशी टीकाही गोपाळ शेट्टी यांनी केली. भाजपाने संजय उपाध्याय यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
भाजपाने अधिकृतपणे उमेदवारी जाहीर केल्यानंतर संजय उपाध्याय अर्ज दाखल करण्यासाठी दाखल झाले. यावेळी केंद्रीय मंत्री आणि याच ठिकाणाहून लोकसभेला खासदार झालेले पीयूष गोयल हेही उपस्थित होते. अशात गोपाळ शेट्टी यांच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दादागिरी नहीं चलेगी, गोपाळ शेट्टी जिंदाबाद अशा घोषणा कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या.
महायुतीकडून मोदी, मोदी अशा घोषणा देण्यात आल्या. गोपाळ शेट्टी यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. पोलिसांकडून दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र कार्यकर्ते ऐकायला तयार नव्हते. कार्यकर्त्यांचा आक्रोश पाहता केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनीही काढता पाय घेतल्याचे सांगितले जात आहे.
आम्ही ही निवडणूक जिंकू : गोयल
महायुती संजय उपाध्याय यांच्यासोबत उभी आहे. आम्ही ही निवडणूक जिंकू, असा विश्वास पीयूष गोयल यांनी व्यक्त केला. दरम्यान, लोकसभा निवडणुकीला भाजपाने गोपाळ शेट्टी यांना डावलून पीयूष गोयल यांना उमेदवारी दिली. गोपाळ शेट्टी सुरुवातीला या निर्णयामुळे नाराज झाले होते. सुनील राणे आणि गोपाळ शेट्टी या दोघांचा पत्ता कट करून भाजपाने थेट संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली. यावरून गोपाळ शेट्टी नाराज झाले आणि अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला.