नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा आता चक्रीवादळात रूपांतरित झाला असून तो वेगाने उत्तर-वायव्य दिशेने किना-याकडे सरकत आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार हे चक्रीवादळ गुरूवार दि. २ ऑक्टोबर रोजी रात्रीपर्यंत ओडिशा आणि लगतच्या आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे.
चक्रीवादळ धडकेल तेव्हा या भागात ताशी ७५ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे की, ३ ऑक्टोबर रोजी वा-याचा वेग ताशी ४५ ते ५५ किलोमीटरपर्यंत कमी होईल. परंतु, वादळाचे परिणाम मात्र अनेक दिवस कायम राहतील. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार हे चक्रीवादळ गोपाळपूर आणि पारादीप किना-यावर पोहोचण्याची शक्यता आहे. दरम्यान, ओडिशा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, बिहार, पूर्व मध्य प्रदेश आणि पूर्व उत्तर प्रदेश या राज्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला.
ओडिशाच्या किनारी आणि दक्षिणेकडील भागांमध्ये बुधवारपासूनच मुसळधार पाऊस सुरू झाला. हवामान विभागाने आज राज्यातील सर्व ३० जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी केला. परिस्थितीचा सामना करण्यासाठी ओडिशा सरकारने संवेदनशील जिल्ह्यांमध्ये तातडीने कर्मचारी आणि आवश्यक यंत्रसामग्री तैनात केली. याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाने मच्छिमारांना ३ ऑक्टोबरपर्यंत ओडिशाच्या किना-याजवळील समुद्रात जाऊ नये असा स्पष्ट सल्ला दिला आहे.