16.9 C
Latur
Saturday, January 4, 2025
Homeराष्ट्रीयडी गुकेश, मनु भाकरसह चौघांना खेलरत्न पुरस्कार

डी गुकेश, मनु भाकरसह चौघांना खेलरत्न पुरस्कार

३२ जणांना अर्जुन पुरस्कार, १७ तारखेला राष्ट्रपतींच्या हस्ते होणार सन्मान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने आज राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२४ ची घोषणा केली. भारतासाठी विविध क्रीडा प्रकारांत २०२४ मध्ये उल्लेखनीय कामगिरी करणा-या खेळाडूंना मेजर धान्यचंद खेळरत्नसह अर्जुन पुरस्कार जाहीर झाले असून, यामध्ये चेस वर्ल्ड चॅम्पियन डी गुकेश आणि ऑलिम्पिकमध्ये भारताला २ मेडल मिळवून देणा-या मनु भाकरसह चौघांना खेळरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे तर एकूण ३२ खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. राष्ट्रपती भवन येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते १७ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता या खेळाडूंना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

डी गुकेश, महिला नेमबाज मनु भाकर, हॉकीपटू हरमनप्रीत सिंह आणि पॅरालिम्पिकपटू प्रवीण कुमार या चौघांना खेळरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच मराठमोळ््या स्वप्नील कुसाळे याच्यासह एकूण ३२ खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर करण्यात आला. डी गुकेश १२ डिसेंबर २००४ रोजी महाअंतिम सामन्यात चायनीज ग्रँडमास्टर डिंग लिरेन याला चेक मेट करत वर्ल्ड चॅम्पियन ठरला. त्यामुळे डी गुकेशने विश्वनाथन आनंद यांच्यानंतर भारताचा दुसरा विश्वविजेता होण्याचा बहुमान मिळवला.

भारतीय महिला नेमबाजपटू मनु भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास घडवला. मनुने भारताला एकाच स्पर्धेत २ पदके मिळवून दिली होती. मनुने सिंगल आणि मिक्स डबल या दोन्ही प्रकारात भारताला कांस्य पदक मिळवून दिले. तसेच हॉकीत कॅप्टन हरमनप्रीत सिंह याच्या नेतृत्वात ऑलिम्पिकमध्ये सलग दुस-यांदा मेडल मिळवले. हरमनला या कामगिरीसाठी खेळरत्न पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. पॅरा हाय जंपर प्रवीण कुमार यानेही पॅरालिम्पिकमध्ये टी ६४ वर्गात सुवर्ण कामगिरी केली. गुडघ्यापासून खाली एक किंवा दोन्ही पाय नसलेल्या खेळाडूंचा समावेश या टी ६४ वर्गात होतो. या श्रेणीतील खेळाडू धावण्यासाठी कृत्रिम पायाचा वापर करतात.

पुरस्कारातून क्रिकेट ‘आऊट’
केंद्र सरकारकडून यंदाच्या पुरस्कारासाठी एकही क्रिकेटपटूची निवड करण्यात आलेली नाही. टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्वात २००७ नंतर टी २० वर्ल्ड कप तर २०११ नंतर आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी केली. त्यामुळे भारतीय संघातील निवडक खेळाडूंना पुरस्कार जाहीर करण्यात येईल, अशी अपेक्षा होती. मात्र, यात भारतीय क्रिकेटपटूचा समावेश नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR