मुंबई: आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढलेला भू-राजकीय तणाव आणि कच्च्या तेलाच्या भडकलेल्या किमतींमुळे भारतीय शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रचंड हाहाकार पाहायला मिळाला. जागतिक बाजारातील नकारात्मक संकेतांमुळे दलाल स्ट्रीटवर विक्रीचा मोठा दबाव निर्माण झाला. परिणामी, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ‘बीएसई सेन्सेक्स’ तब्बल ७१९.०८ अंकांनी कोसळून ७३,५२४.२६ या पातळीवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक ‘निफ्टी ५०’ मध्येही २४३.७० अंकांची मोठी घसरण झाली आणि तो २३,१२३.०० या पातळीवर स्थिरावला.
दिवसभराच्या व्यवहारादरम्यान सेन्सेक्स एका वेळी तब्बल ९२४ अंकांनी खाली घसरला होता, मात्र बाजार बंद होताना त्यात किंचित सुधारणा झाली. बाजारातील या अचानक आलेल्या भूकंपामुळे गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात तब्बल ७ लाख कोटी रुपये बुडाले आहेत. या मोठ्या घसरणीमुळे बीएसईवर सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल ४५५ लाख कोटी रुपयांच्या खाली आले आहे. गेल्या ट्रेडिंग सत्राच्या तुलनेत बाजार भांडवलात झालेल्या या प्रचंड घसरणीमुळे गुंतवणूकदारांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
या घसरणीमागे प्रामुख्याने पश्चिम आशियातील वाढता तणाव कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. इस्रायल आणि इराण यांच्यात क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा थेट फटका जागतिक बाजारांना बसला. युद्ध दीर्घकाळ चालण्याच्या भीतीने गुंतवणूकदारांनी इक्विटी बाजारातून पैसे काढण्यास सुरुवात केली आहे. या जागतिक तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड ऑईलचे दर ४ टक्क्यांहून अधिक वाढून ९६.९१ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहेत. भारत खनिज तेलाचा मोठा आयातदार असल्याने तेलाचे दर वाढल्यास देशात महागाई वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.
याशिवाय अमेरिकन बाजारात गेल्या सत्रात नॅस्डॅक ४ टक्क्यांनी घसरला होता. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रातील तेजी आता संथ पडत असल्याच्या भीतीने जागतिक पातळीवर तंत्रज्ञान आणि सेमीकंडक्टर कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी नफावसुली पाहायला मिळाली. दुसरीकडे परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून मोठ्या प्रमाणावर पैसे काढून घेतले आहेत, ज्याचा बाजाराच्या मानसिकतेवर नकारात्मक परिणाम झाला. याच दरम्यान डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया ५६ पैशांनी घसरून ९५.७४ या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर बंद झाला.
आजच्या सत्रात विक्रीचा जोर इतका जास्त होता की मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांमध्ये मोठी घसरण झाली. रियल्टी, मेटल आणि ऑटो क्षेत्रातील शेअर्स सर्वाधिक घसरले. सेन्सेक्समधील प्रमुख कंपन्यांपैकी जोमॅटोची मूळ कंपनी ‘इटर्नल’चा शेअर ३ टक्क्यांहून अधिक घसरला. याशिवाय महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा स्टील, बजाज फायनान्स, ट्रेंट, रिलायन्स इंडस्ट्रीज, इंडिगो आणि टीसीएस या आघाडीच्या शेअर्समध्ये २ टक्क्यांपेक्षा जास्त घसरण झाली. दुसरीकडे, बाजाराच्या या पडझडीतही पॉवर ग्रिड, भारती एअरटेल, भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि टेक महिंद्रा या शेअर्सनी वाढ नोंदवत स्वतःला सावरून धरले. बाजार तज्ज्ञांच्या मते, जोपर्यंत जागतिक पातळीवरील युद्धजन्य परिस्थिती शांत होत नाही आणि कच्च्या तेलाचे दर नियंत्रणात येत नाहीत, तोपर्यंत बाजारातील ही अस्थिरता अशीच कायम राहण्याची शक्यता आहे.
















