26.4 C
Latur
Saturday, December 28, 2024
Homeराष्ट्रीयसीम स्वॅप करून थेट बँक खात्यांवर डल्ला!

सीम स्वॅप करून थेट बँक खात्यांवर डल्ला!

सायबर गुन्हेगारांची शक्कल, खातेदाराला काहीही न कळू देता अन्य खात्यांत वळवले जातात पैसे

मुंबई : प्रतिनिधी
अलिकडे सीम स्वॅपच्या घटना वाढू लागल्या आहेत. सीम स्वॅप करून थेट संबंधित सीमचा अ‍ॅक्सेस मिळवला जातो आणि खातेदाराला कळू न देता परस्परच खात्यावरील पैसे अन्य खात्यात वर्ग केले जातात. यातून अनेकांचे बँक खाते साफ होण्याचा धोका आहे. त्यामुळे बँक खातेदारांनी आता नेहमी अलर्ट राहणे गरजेचे आहे.

मुंबईतील कांदिवली भागातील व्यापा-याच्या खात्यावर सीम स्वॅप करूनच डल्ला मारला गेला. ही घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या व्यापा-याचे सीम स्वॅप करून सायबर चोरट्यांनी तब्बल ७ कोटी ४२ लाखांहून अधिक रक्कम परस्पर इतर खात्यांवर वळवल्याची धक्कादायक माहिती समोर आली. विशेष म्हणजे या फसवणुकीची कुठलीही कल्पना व्यापा-याला नव्हती. फोन लागत नसल्याचे जेव्हा त्यांना सांगण्यात आले, त्यावेळी व्यापारी संबंधित सीमकार्ड गॅलरीत गेला. त्याची चौकशी केली, तेव्हा त्यांचे सीम हॅक झाल्याचे समोर आले. परंतु तोपर्यंत ७ कोटींपेक्षा जास्त रक्कम वर्ग केली होती.

कांदिवली परिसरातील विकास गुप्ता यांचा स्टिलचा व्यवसाय आहे. या व्यवसायाशी संबधित कंपनीच्या बँक खात्याला त्यांचे मोबाइल फोन लिंक होते. रविवारी २२ डिसेंबर रोजी विकास यांचे भाऊ वरूण गुप्ता यांचा फोन अचानक नॉट रिचेबल येऊ लागला. त्यावेळी बहुदा बिल भरले नसल्याने सीमकार्डची सेवा बंद केल्याचे गुप्ता यांना वाटले. दुस-या दिवशी सोमवारी २३ डिसेंबर रोजी गुप्ता बंधू हे जवळील मोबाइल सीम कंपनीच्या कस्टमर केअरमध्ये गेले.

तिथे केलल्या चौकशीत गुप्ता यांचे सीम कार्ड हॅक झाल्याची माहिती देण्यात आली. तसेच तातडीने या नंबरशी संबधित बँक खातीही गोठवण्याचा सल्ला दिला. तोपर्यंत रविवारी रात्रीच त्यांच्या खात्यातून तब्बल ७ कोटी ४२ लाखांहून अधिक रक्कम इतर ८५ खात्यांत वळवण्यात आल्याची माहिती समोर आली.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गुप्ता बंधूंनी तातडीने बँक खात्यावरील सर्व व्यवहार बंद करत बीकेसीतील सायबर पोलिस ठाणे गाठले. सायबर पोलिसांनीही लगेचच तपास सुरू केला. सायबर पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर गुप्तांच्या खात्यातून वर्ग झालेल्या रकमेपैकी ४ कोटींची रक्कम गोठवण्यात यश आले.

सायबर चोरट्यांनी थेट मोबाईलवर मिळवला ताबा
गुप्ता यांच्या मोबाइलचा ताबाच आरोपींनी मिळवल्याने होणा-या व्यवहाराबाबतचे ओटीपी त्यांच्या मोबाइलवर न येता आरोपींना ते मिळत होते. त्याच्याच मदतीने आरोपींनी अवघ्या काही मिनिटांत गुप्तांचे खाते रिकामे केले. याची पुसटशी कल्पनाही गुप्तांना होऊ दिली नाही. त्यात रविवार असल्याने बँकांही बंद होत्या. त्याच रात्री चोरट्यांनी पैसे वर्ग केले.

सीमचा अ‍ॅक्सेस मिळवून खात्यात वळवले जातात पैसे
सीम स्वॅपिंगच्या माध्यमातून स्कॅमर्स मोबाइलमधील सीम कार्डचा ऍक्सेस मिळवतात. त्यानंतर यूजरच्या फोनचा सर्व कंट्रोल हा त्याच्या हातात जातो. यूजरला येणारे फोन मेसेज हेदेखील स्कॅमर्सपर्यंत पोहचतात. त्यामुळे पैसे काढताना येणारा एसएमएस स्कॅमर्सला मिळाली की, ते युजरच्या डिटेल्ससह पैसे चोरी करता येतात. अनेकदा स्कॅमर यूजरच्या सीमचा ऍक्सेस मिळाला की युजरचे मित्र आणि नातेवाईकांकडूनही पैसे मागतात. सध्या टू-फॅक्टर व्हेरिफिकेशन आवश्यक असल्याने एखाद्या स्कॅमरला तुमच्या सीम कार्डचा ऍक्सेस मिळाला तर तुमचे संपूर्ण अकाऊंट रिकामे होईल.

सलग सुट्याच्यावेळी सीम स्वॅपिंगचा प्रयत्न
प्रत्येक बँक अकाऊंटला इमेल अलर्ट लावण्याची गरज आहे. तसेच अचानक सीम बंद झाले तर बँकेला त्याचा अकाऊंटशी संबंध तोडण्यास सांगितले पाहिजे. सीम स्वॅपिंगचे प्रकार साधारणपणे शुक्रवारी, शनिवारी किंवा सलग सुट्याच्यावेळी घडतात. सुटी असल्यामुळे लोकांना मोबाइल गॅलरी किंवा बँकांशी संपर्क करण्यात अडथळा येतो. त्यामुळे या काळात सीम बंद पडल्यास वेगाने पावले उचलणे गरजेचे आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR