मुंबई : हळदीचा कार्यक्रम सुरू असताना चोराने घरातून दीड लाख रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना मालाडमध्ये घडली. याप्रकरणी पालिकेच्या मालाडमधील नोकरी करणा-या वंदना गुळेकर (५५) यांच्या तक्रारीवरून कुरार पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
गुळेकर यांचा मुलगा लौकिक याच्या हळदीचा कार्यक्रम १० मार्चला सायंकाळी त्यांच्या ओंकार एसआरए इमारतीत होता. लग्नासाठी पैसे आणि दागिने गुळेकर यांनी कपाटातून काढून पर्समध्ये भरून ती पर्स देवघराजवळील टेबलावर ठेवली होती.
११ मार्चला सकाळी ७:३० वाजेच्या सुमारास पैशांसाठी वंदना पर्स घेण्यासाठी गेल्या असता त्यांना ती मिळाली नाही. मुला-मुलींसह शेजारी आणि नातेवाइकांकडेही चौकशी केली. मात्र, त्यांनी काहीच माहिती नसल्याचे सांगितले.
कार्यक्रमात व्यस्त असल्याचा फायदा घेऊन ही पर्स अनोळखी व्यक्तीने चोरल्याचे त्यांच्या लक्षात आले. या पर्समध्ये सोन्याचे दागिने आणि जवळपास १ लाख २० हजारांची रोकड असा एकूण १ लाख ४९ हजारांचा ऐवज होता. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अनोळखी चोरट्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे.