पूर्णा : शहरातील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या बाजूस असलेली लासिना पाटबंधारे उपविभागीय कार्यालयाची इमारत अत्यंत जीर्ण अवस्थेत पोहोचली असून, तेथील अधिकारी आणि कर्मचा-यांना जीव मुठीत घेऊन काम करावे लागत आहे.इमारतीचे छत कोसळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या इमारतीच्या भिंतींना मोठे तडे गेले असून, छताच्या काही भागांतून सिमेंट आणि गिलावा कोसळत आहे. पावसाळ्यात पाणी गळतीची समस्या अधिकच गंभीर बनते, त्यामुळे येथे काम करणा-या कर्मचा-यांना सतत भीतीच्या छायेत काम करावे लागत आहे. छताचा काही भाग अचानक कोसळल्याने कर्मचा-यांना किरकोळ दुखापतीही झाल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत वरिष्ठ अधिका-यांनी तातडीने लक्ष घालावे आणि नव्या इमारतीच्या उभारणीसाठी आवश्यक पावले उचलावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे. आता प्रशासन यावर कसा प्रतिसाद देते आणि नवीन इमारतीबाबत काय निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.