29.5 C
Latur
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रमराठा, ओबीसी मतदारांच्या ‘गुगलीवर’ दानवे ‘सिक्सर’ ठोकणार!

मराठा, ओबीसी मतदारांच्या ‘गुगलीवर’ दानवे ‘सिक्सर’ ठोकणार!

महायुती, महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांतील स्थानिक विरोध दूर केल्यानंतरच विजयाला गवसणी शक्य

जालना : प्रतिनिधी
जालना लोकसभा मतदार संघात महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर झाले. त्यामुळे दोन्ही उमेदवारांनी मित्रपक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मनोमिलन करण्यासाठी बैठकांचा सपाटा सुरू केला. मात्र, या दुरंगी लढतीमध्ये वंचित बहुजन आघाडीचाही उमेदवार रिंगणात असल्याने हा उमेदवार कुणाची मते खेचणार याचीच चर्चा होत आहे.

या मतदारसंघातून महायुतीची जागा पूर्वीपासून भाजपची असल्याने भाजपकडून पाचवेळा विजयी झालेल्या केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना सहाव्यांदा उमेदवारी जाहीर करण्यात आली. ‘मविआ’मध्ये ही जागा कॉँग्रेसची असल्याने उद्धव ठाकरे गटाकडून मागणी केल्यानंतरही या आघाडीमध्ये जालन्याची जागा काँग्रेसकडे कायम राहिली. त्यामुळे काँग्रेसने २००९ मध्ये दानवे यांना कडवी लढत देणारे माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांना उमेदवारी दिली.

महायुती आणि महाविकास आघाडीतील मित्रपक्षांमधील स्थानिक पातळीवरील राजकीय विरोध दूर केल्यानंतरच विजयाला गवसणी घालणे शक्य होणार आहे. त्यात महायुतीमधील शिवसेना शिंदे गटाचे उपनेते अर्जुन खोतकर यांच्या नाराजीचा सूर अधूनमधून निघत आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने जालन्याच्या जागेची मागणी केल्यानंतर लोकसभेसाठी इच्छुक काँग्रेसचे राज्य प्रवक्ते संजय लाखे पाटील यांनी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला. मात्र ही जागा कॉँग्रेसलाच मिळाल्याने त्यांचा हिरमोड झाला.

जालना मतदारसंघात ‘वंचित’ने प्रभाकर बकले यांना उमेदवारी जाहीर केली असून २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ‘वंचित’ने तब्बल ७६ हजार ९२४ मते घेतली होती. त्यामुळे यंदाही ‘वंचित’चा उमेदवार किती मते खेचतो याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

रावसाहेब दानवे यांच्या बाबतीत अँटिइन्कबन्सी, खोतकरांची नाराजी, मराठा, ओबीसी आरक्षणाचे भिजत घोंगडे व इतर कांही नकारात्मक मुद्दे असले तरीही महाविकास आघाडीने उमेदवार ठरविण्यात वाया घालवलेला वेळ दानवेंच्या पथ्थ्यावर पडू शकतो. शिवाय संभाजीनगर व जालना या दोन्ही जिल्ह्यांतील सर्व पक्ष व प्रभावी नेत्यांसोबत त्यांचे असलेले जिव्हाळ्याचे संबध हे वादातीत अशा प्रकारचे आहेत. त्यामुळे या मतदारसंघात मराठा आणि ओबीसी मतदारांच्या ‘गुगलीवर’ दानवे यांचा विजयी षटकार बसतो की, त्यांची विकेट पडते, याकडे सा-यांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR