परभणी : येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी महाविद्यालय लातूर येथे पार पडलेल्या आंतर महाविद्यालयीन कलारंग युवक महोत्सव अतिशय जल्लोषात सादर झाला. या आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवात सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लोककला, सामुहिक नृत्य कलाप्रकारात सहभागी होऊन यशस्वी होण्याची परंपरा यंदाही कायम राखली. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इन्द्र मणि आणि शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके यांनी पुष्पगुच्छ देऊन सहभागी विद्यार्थ्यांचा गौरव केला.
या आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवानिमित्त सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राची लोकधारा या संकल्पनेच्या आधारे लोककला समूह नृत्यासाठी पंढरीची वारी या कल्पनेवर दिंडी अंतर्गत होणा-या विविध पैंलूचे सादरीकरण केले. सदरील युवक महोत्सवात लोककला समूहनृत्य प्रकारामध्ये या महाविद्यालयाच्या संघाने द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. यासाठी पंकज खंदारे आणि प्रवीण कसबे यांचे नृत्य दिग्दर्शक म्हणून मार्गदर्शन लाभले. या संघांला मृदुंग वादक गणेश शिंदे, प्रा. गोविंद पवार अशा गायकाचे सहकार्य मिळाले.
सांस्कृतिक समितीच्या प्रमुख व संघ व्यवस्थापक डॉ. नीता गायकवाड आणि डॉ. अश्विनी बिडवे यांनी यशस्वीपणे जबाबदारी पार पाडली. दरवर्षीप्रमाणे यंदाही बक्षिसाची परंपरा कायम राखल्याबद्दल सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे, डॉ. वीणा भालेराव, डॉ. शंकर पुरी, डॉ. विद्यानंद मनवर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.