सिपाहीजाला : त्रिपुराच्या सिपाहीजाला जिल्ह्यातील बॉक्सानगर येथील आशाबाडी भागात सीमा सुरक्षा दलाच्या जवानांवर काही लोकांनी हल्ला केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी आता कारवाई करत पोलिसांनी महिला आणि पुरुषांसह ९ जणांना अटक केली आहे. यांत ६ पुरुष आणि ३ महिलांचा समावेश आहे. यासंदर्भात सिपाहीजालाचे पोलिस अधीक्षक बिजॉय देबबर्मा यांनी मंगळवारी माहिती दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास बीएसएफचे जवान सीमेवर गस्त घालत होते. तेव्हाच त्यांना सीमा भागात तस्करीचा प्रयत्न सुरू असल्याचे निदर्शनास आले. जवानांनी तस्करांना रोखण्याचा प्रयत्न केला. यामुळे त्यांच्यात झडपही झाली. यावेळी तस्करांनी जवानांवर दगडफेकही केली. अखेर जवानांनी तस्करी होत असलेला गांजा जप्त केला आणि तस्कर पळून गेले. मात्र, पळून गेलेले तस्कर काही वेळानंतर पुन्हा परतले आणि त्यांनी रस्ता अडवला. दरम्यान बीएसएफचे एक असिस्टंट कमांडंट आपल्या जवानांसह तेथे पोहोचले असता पळून संबंधित लोकांनी जवानांवर प्राणघातक हल्ला केला. तसेच त्यांची शस्त्रेही हिसकावून घेण्यात आली.
असिस्टेंट कमांडंटसह तीन जवान जखमी
या हिंसक हल्ल्यात बीएसएफचे असिस्टंट कमांडंट आणि दोन कॉन्स्टेबल गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि बीएसएफची अतिरिक्त टीम तत्काळ घटनास्थळी पोहोचली आणि जखमी जवानांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, या घटनेसंदर्भात बोलताना, ही घटना अत्यंत गंभीर आणि अस्वीकार्य आहे. पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून ९ जणांना अटक केली आहे. सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले जाईल. या हल्ल्यात सहभागी असलेल्या इतर संशयितांची ओळख पटवली जात आहे. त्यांच्यावरही कडक कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलिस अधीक्षक बिजॉय देबबर्मा यांनी म्हटले आहे.
















