ऐ अहले-सियासत ये कदम रुक नही सकते
रुक सकते है फनकार कलम रुक नही सकते
आपल्या शायरीतील बंडखोर वळणाचाच वारसा रोजच्या जगण्यातही घेऊन जगणारे आणि त्यातून वादांशी गहिरे नाते जोडणारे मात्र त्याचवेळी आपल्या गझलेतून रसिकप्रिय शायर बनलेले मुनव्वर राणा यांनी वयाच्या ७१व्या वर्षीच रविवारी मध्यरात्रीनंतर ‘एक्झिट’ घेतली. मुनव्वर राणा मागच्या काही वर्षांपासून घशाच्या कर्करोगाशी झुंज देत होते. रविवारी मध्यरात्री अखेर या बंडखोर शायरची ही झुंज संपुष्टात आली. प्रकृती जास्त खालावल्याने मागच्या आठवड्यात त्यांना लखनौच्या संजय गांधी पदव्युत्तर आयुर्विज्ञान संस्थेत दाखल करण्यात आले होते.
उपचार सुरू असतानाच हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांची प्राणज्योत मालवली! मुनव्वर राणा यांचा जन्म २६ नोव्हेंबर १९५२ रोजी उत्तर प्रदेशातील रायबरेली येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव अन्वर तर आईचे नाव आयशा खातून. अन्वर यांचा वाहतुकीचा व्यवसाय होता. मुनव्वर राणा यांनी पुढे तो सांभाळला. वयाच्या तेराव्या वर्षापासूनच त्यांना शायरीची गोडी लागली. आईविषयी असणा-या ममत्वातून त्यांनी आपला पहिला शेर आईवरच लिहिला. त्यांच्या प्रतिभावंत लेखणीतून आईविषयीचे ममत्व असे काही पाझरले की, प्रत्येक सामान्यालाही ती आपलीच भावना असल्याची अनुभूती झाली आणि त्यातूनच त्यांच्या शायरीने रसिकांच्या मनाचा ठाव घेतला.
किसी को घर मिला हिस्से में
या कोई दुकाँ आई
मैं घर में सबसे छोटा था
मिरे हिस्से में माँ आई
हा राणांचा शेर आला तेव्हा प्रत्येक घरातील लहान भावाला हे आपलेच मनोगत असल्याची अनुभूती झाली.
मैने रोते हुए पौंछे थे किसी दिन आँसू
मुद्दतो माँ ने नही धोया दुपट्टा अपना
असे राणांनी लिहिले तेव्हा लहान-मोठ्या सा-या मुलांच्या डबडबलेल्या डोळ्यांत आईच्या पदराची ओली माया ओथंबून आली. आजही हे शेर वाचणा-यास ते आईच्या मायेची अनुभूती देतात व त्याच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्याशिवाय राहत नाहीत! कारण राणांच्या शायरीतून उतरलेले अनुभव हे शाश्वत व चिरंतन अनुभव आहेत आणि ते कमी-अधिक प्रमाणात प्रत्येकाच्या वाट्याला आलेले आहेत. त्यांनी गझलेतून आई विशद करून प्रत्येकाला चिरंतन भावजाणिवेची पुनश्च अनुभूती मिळवून दिली. त्यांच्या शब्दांच्या या गारुडातून गानसम्राज्ञी लता मंगेशकरही सुटल्या नाहीत. लतादीदींच्या विशेष आग्रहावरून मुनव्वर राणा यांनी लतादीदींचे वडील दीनानाथ मंगेशकर यांच्यासाठी ‘बाबा’ ही नज्म लिहिली होती. राणांच्या शब्दांमध्ये एकीकडे मानवी भावजाणिवेची उत्कट व चिरंतन तरलता होती तर दुसरीकडे फाळणीच्या अपार वेदनाही होत्या.
फाळणीमुळे कुटुंबाच्या वाट्याला दारिद्र्य आले, अभावाचे जगणे आले. या अभावातूनच त्यांचा माणुसकीचा शोध सुरू झाला. त्यांच्या या शोधाचे प्रतिबिंब त्यांच्या शायरीत उमटत राहिले. त्यातूनच त्यांची समाजव्यवस्थेबाबत, राजकीय व्यवस्थेबाबतची बंडखोरीही उफाळून आली. ती त्यांनी कधी दाबण्याचा वा दडपून टाकण्याचा प्रयत्न अजिबात केला नाही आणि म्हणूनच त्यांचे वादाशी गहिरे नातेही कायम राहिले. प्रेमाची ‘शमा’ सजवून मैफिलीत वाचलेले विरहाचे कशिदे म्हणजे शायरी, ही उर्दू शायरीची व्याख्या मुनव्वर राणा यांना अजिबात मान्य नव्हती. त्यामुळेच त्यांनी सुरुवातीपासूनच वेगळी वाट निवडली! शायरीपासून लांबच राहिलेले आईची माया, बहिणीची माया, समाजातला वैचारिक दुभंग, धर्माचे अवास्तव स्तोम, फाळणीचे दु:ख, राज्यकर्त्यांचा अहंकार या सगळ्या जीवनाच्या अविभाज्य बाबींना, दु:खांना राणा यांनी आपल्या शायरीचा आधार बनविले. त्यातून त्यांची शायरी सामान्यांच्या जगण्याचा अनुभव मांडणारी ठरली व प्रत्येकाच्या काळजाला भिडणारी बनली.
एक आँसू भी हुकूमत के लिए खतरा है
तुमने देखा नही आँखोका समुंदर होना
अशा शब्दांमध्ये ते राज्यकर्त्यांना ठणकावतात. त्याचवेळी एकोपा किती आवश्यक आहे, हे सांगताना ‘किसी के जख्म पर चाहतसे पट्टी कौन बांधेगा, अगर बहने नही होगी तो राखी कौन बाँधेगा’ अशी जाणीवही प्रत्येकाला करून देतात. राणांची मते परखड राहिली. प्रसंगी ती अवाजवी टोकाचीही ठरली. त्यातून राणांचे आयुष्य अनेक वादळी किस्स्यांनी भरलेले ठरले. अयोध्या निकालावरचे आक्रमक मतप्रदर्शन, तालिबान्यांची भलत्याशीच केलेली तुलना यातून त्यांच्यावर टीकाही झाली. २०१५ मध्ये त्यांनी देशातल्या वाढत्या असहिष्णुतेचा मुद्दा मांडला. उत्तर प्रदेशच्या दादरी येथे अखलाकचा झुंडबळी गेल्यानंतर मुनव्वर राणा यांनी एका वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान थेट त्यांना मिळालेला साहित्य अकादमीचा पुरस्कार परत करण्याची घोषणा केली होती. एवढेच नाही तर यानंतर आपण कुठलाही सरकारी पुरस्कार स्वीकारणार नाही, अशी जाहीर प्रतिज्ञाही त्यांनी केली होती. २०२२ मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी राणांनी ‘योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्री झाले तर मी उत्तर प्रदेशात राहणार नाही,’ असे वक्तव्य केल्याने मोठे वादळ उठले होते.
त्यातून त्यांच्या राष्ट्रीयत्वावरही प्रश्नचिन्ह लावले गेले. मात्र त्यांनी आपल्या परखड व स्पष्ट भूमिकेवरून कधीच माघार घेतली नाही. ते त्यांची मते हट्टाने परिणामांची चिंता न करता मांडत राहिले. शेवटच्या दिवसांत राणांना अनेक गंभीर आजारांनी घेरले होते. मात्र, या आजारांपेक्षा शायरीतून सतत माणुसकी शोधणा-या या कलंदराला त्यांच्या स्वकीयांनीच कौटुंबिक संपत्तीसाठी त्रास दिला तो त्यांना जास्त पोखरून टाकणारा होता. त्या दु:खातून त्यांना शेवटपर्यंत सावरणे शक्य झाले नाही. जगाचा निरोप कधी ना कधी घ्यावा लागणे अटळच! याची राणांनाही पक्की जाणीव होती. त्यामुळे त्यांनी स्वत:च्या मृत्यूबाबतही लिहून ठेवले होते.
हम से मोहब्बत करने वाले रोते ही रह जाएंगे
हम जो किसी दिन सोए तो सोते ही रह जाएंगे...
आयुष्यातील मानवी भावजाणिवांनाच शायरीत शब्दबद्ध करून रसिकांना त्याची अनुभूती करून देत माणुसकीचा संदेश देणा-या या रसिकप्रिय शायराला ‘एकमत’ची विनम्र आदरांजली!