नागपूर : राज्यातील आरोग्य यंत्रणा सलाईनवर आहे, रुग्णांचा मृत्यू होतोय. बुलडाण्यात एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्यानंतर विधानसभेत विरोधक आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले. त्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, बुलडाणा जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात गर्भवती महिलेला डेंग्यू झालेला असतानाही उपचार करण्यात आले नाहीत. नंतर तिला अकोल्याला हलवण्यात आले. मात्र सायंकाळी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
बुलडाण्याच्या रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ रुग्णालयात हजर नव्हते का? गर्भाचे ठोके येत नव्हते असे सांगितले जाते. मग गर्भ का काढण्यात आला नाही? डॉक्टरांनी वेळीच उपचार केले असते तर महिलेचा जीव वाचला असता, असे राजेश टोपे म्हणाले.
यावेळी विजय वडेट्टीवार यांनी आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी केली आहे. मंत्री अभ्यास करून येत नाहीत.. त्यामुळे केवळ चौकशी करतो म्हणून वेळ मारून नेली जाते, असाही आरोप त्यांनी केला.
आरोग्य विभागातील रिक्त जागांचा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केला. मागील अनेक वर्षांपासून नुसते आश्वासनं दिली जात आहेत. राज्याचा आरोग्य विभाग सक्षम करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. विरोधकांनी विधानसभेतून वॉक आऊट केले आहे.