बार्शी : मालेगाव (ता.बार्शी) येथे भिशीच्या पैशाच्या कारणावरून सुरेश लालासाहेब घोडके(६०) यांना भरदिवसा काठीने लोखंडी रॉडने केलेल्या जबर मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी संशयित आरोपी समाधान भारत घोडके (३६) व जनाबाई भारत घोडके अशा दोघांविरुद्ध वैराग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटना मालेगाव (ता. बार्शी) येथील समाज मंदिराजवळ घडली.
दादासाहेब सुरेश घोडके(मालेगाव ता. बार्शी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी व माझे वडील सुरेश घोडके असे दोघे सकाळी शेतात जाऊन गावी परत आलो होतो. दरम्यान सकाळी साडेनऊ वाजता गावातील लोकांनी सांगितले की, समाधान घोडके व इतर दोघेजण तुझ्या वडिलांना मारहाण करीत आहे. त्यावरून घटनास्थळी गेलो असता, वडिलांना तीन जण काठीने मारहाण करीत होते. त्याला अडविण्याचा प्रयत्न केला असता, मलाही मारहाण केली. दरम्यान मी शंभर नंबर डायल करून पोलिसांना बोलविले. दरम्यान वडील गंभीररीत्या जखमी होऊन जमिनीवर पडले होते. त्यांना धाराशिव येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी नेले असता, डॉक्टरांनी मृत झाल्याचे सांगितले.
या घटनेदरम्यान आरोपीने ११२ नंबरवर फोन करून माझ्या आईची छेडछाड केल्याचे सांगितल्याचे समजते. याबाबत वैराग पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेतले.