गोंदिया : प्रतिनिधी
झोपेत मण्यार हा विषारी साप चावल्याने माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील आदिवासी बहुल भागात येणा-या गुजूरबोडगा गावामध्ये घडली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री उसेंडी कुटुंब झोपले असताना सात वर्षाच्या मुलीला आणि तिच्या आईला मण्यार सापाने चावा घेतला. काहीतरी चावल्याचे लक्षात येताच त्यांना साप दिसला. त्यांनी आरडोओरडा केल्यानंतर आजूबाजूला राहणारे पळत आले आणि सापाला मारले. त्यानंतर दोघींनाही उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले.
मात्र उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केले. आईची प्रकृती गंभीर असल्याने तिला गोंदिया येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र तिथे दाखल करण्यापूर्वी तिचाही मृत्यू झाला. यामुळे उसेंडी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.