अकोला : कधी, कोणत्या क्षणी काय होईल, हे सांगता येत नाही, असेच काहीसे अधोरेखित करणारी एक दुर्दैवी घटना अकोला जिल्ह्यात समोर आली आहे. तुरीचा दाणा श्वासनलिकेत अडकून अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अकोल्यातील अकोट तालुक्यातील पाटसूल गावात ही अतिशय दुर्दैवी आणि धक्कादायक घटना घडली. योगीराज अमोल इसापुरे (वय वर्षे ३) असे या मृत चिमुकल्याचे नाव आहे. योगीराज याच्या अचानक जाण्यामुळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगरच कोसळला. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अकोल्यातील दहीहंडा पोलिस स्टेशन हद्दीत एक दु:खद घटना घडली आहे. तुरीचे दाणे खात असताना अचानकपणे नाकात तुरीचा दाणा अडकल्याने योगिराज इसापुरे या ३ वर्षीय चिमुकल्याचा तडफडून मृत्यू झाला. घरात आजी तुरीचे दाणे काढत असताना त्यांचा नातू योगीराज अमोल इसापुरे (वय ३) हा आजीजवळ आला.
आजीने काढून ठेवलेले तुरीचे दाणे योगीराजने मुठीत घेतले आणि तोंडात कोंबले. त्यातील एक दाणा त्याच्या नाकात म्हणजेच श्वासनलिकेत अडकला गेला. त्यामुळे त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्याची तब्येत बिघडली. त्यामुळे घरातले सगळेच घाबरले. त्याला काय होतंय असं विचारू लागले. तो तडफडत असल्याचे पाहून लागलीच कुटुंबीयांनी त्याला तातडीने अकोटच्या रुग्णालयात नेले. परंतु वाटेतच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.