18.1 C
Latur
Monday, January 6, 2025
Homeसोलापूरशिष्यवृत्ती परीक्षेसाठी विलंब शुल्कासह अर्ज भरण्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदत

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विलंब शुल्कासह अर्ज भरण्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदत

सोलापूर : पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा १८ फेब्रुवारीला होणार आहे. त्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील ३६ हजार ९६२ विद्यार्थ्यांनी नियमित शुल्कासह ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज केले आहेत. शिष्यवृत्तीला बसणे ऐच्छिक असतानाही ठरावीक विद्यार्थ्यांचेच अर्ज भरण्यात आल्याची स्थिती आहे. आता विलंब शुल्कासह अर्ज भरण्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदत आहे.

इयत्ता पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच स्पर्धा परीक्षांची गोडी लागावी, त्यांच्यातील विविध क्षमतांचा विकास व्हावा, शैक्षणिक गुणवत्ता वाढावी या हेतूने दरवर्षी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे शिष्यवृत्तीची परीक्षा घेतली जाते. परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणाऱ्या पाचवीतील विद्यार्थ्यांना वार्षिक पाच हजार रुपये तर इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना साडेसात हजारांची शिष्यवृत्ती मिळते.

परीक्षेला बसणे ऐच्छिक आहे, पालक व विद्यार्थ्यांनी परीक्षेला बसण्याची तयारी दर्शविल्यास त्या मुलास अर्ज करता येतो. मात्र, बहुतेक शाळांमधील मुख्याध्यापक किंवा शिक्षकांना जे विद्यार्थी हुशार वाटतात, त्यांचेच शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यात आल्याची पालकांची ओरड आहे. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी २०० रुपये तर मागासवर्गीय मुलांसाठी १२५ रुपयांचे परीक्षा शुल्क असतानाही अनेक विद्यार्थ्यांचे अर्जच भरले नाहीत, अशी वस्तुस्थिती आहे. दरम्यान, प्रत्येक विद्यार्थ्याला शिष्यवृत्तीला बसण्याचा अधिकार नाही का, गोरगरिबांच्या मुलांना अशा परीक्षा देताच येणार नाहीत का, असा सवाल उपस्थित होत आहे.

जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये इयत्ता पाचवीत १६ हजार १६४ विद्यार्थी असून आठवीची पटसंख्या दोन हजार ७९ आहे. खासगी शाळांमधील पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची संख्या ४० हजारांपर्यंत आहे. तरीपण, जिल्ह्यातील इयत्ता पाचवीमधील १० हजार ३६६ मुलांचे आणि ११ हजार ८९४ मुलींचे तर आठवीतील सहा हजार ४०१ मुले व आठ हजार ३०१ मुलींचेच शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्यात आले आहेत. शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरलेल्यांमध्ये खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांचीच संख्या मोठी आहे. जिल्हा परिषदेने शिष्यवृत्ती परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी २० लाख रुपयांची तरतूद करूनही अर्जांची संख्या कमीच असल्याचे चित्र आहे.

पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती फेब्रुवारी २०२४मध्ये होईल. शिष्यवृत्तीसाठी त्या इयत्तांमधील प्रत्येक विद्यार्थी अर्ज करू शकतो. खुल्या प्रवर्गातील मुलांसाठी २०० रुपये तर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी १२५ रुपयांचे परीक्षा शुल्क आहे. १५ डिसेंबरपर्यंत विलंब शुल्कासह अर्ज करण्याची मुदत आहे.असे शिक्षण संचालक (योजना), पुणे डॉ. महेश पालकर यांनी सांगीतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR