25.7 C
Latur
Monday, February 24, 2025
Homeपरभणीदीपक दराडेंच्या अवयवाने ५ जणांना जीवदान

दीपक दराडेंच्या अवयवाने ५ जणांना जीवदान

ग्रीन कॉरिडोर यशस्वी ४ तासांच्या आत राज्यातील ५ ठिकाणी अवयवांचे प्रत्यारोपन पूर्ण

परभणी : दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या दीपक दराडे या युवकास रूग्णालयात नेले असता मेंदुमृत झाल्याचे निदान झाल्यानंतर कुटुंबियांनी घेतलेल्या निर्णयानंतर युवकाच्या अवयवदानामुळे ५ गरजू रूग्णांना जीवदान मिळाले आहे.

अवयवदानाची ही प्रक्रिया दि. २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी परभणी शहरातील देवगिरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सुरू करण्यात आली होती. त्यानंतर ग्रीन कॉरिडॉरने हे अवयव वेगवेगळ्या शहरात पाठवण्यात आले असून ५ गरजू रूग्णांना हे अवयव यशस्वीरित्या प्रत्यारोपण करण्यात आल्यामुळे या ५ रूग्णांना जीवदान मिळाले आहे.

जिंतूर तालुक्यातील चिंचोली दराडे येथील दीपक विलासराव दराडे (२६) यास शनिवारी संंध्याकाळी जिंतूर-औंढा महामार्गांवर एका पेट्रोलपंपाजवळून स्वत:च्या शेतातून पायी घरी जात असताना एका दुचाकीने जोराची धडक दिली. या अपघातात त्याच्या शरिरावर कुठलीही जखम नव्हती. आपल्याला काहीच झालेले नाही असे समजून तो रात्री घरी जाऊन झोपला.

दुस-या दिवशी सकाळी तो झोपेतून उठत नसल्यामुळे नातेवाईकांनी त्याला परभणी येथे देवगिरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले. त्याठिकाणी डॉ. एकनाथ गबाळे यांनी तपासणी करून अपघातात डोक्याअंतर्गत रक्तस्त्राव होऊन तो मेंदूमृत (ब्रेनडेड) झाल्याचे सांगितले. अशा स्थितीत रूग्णाचे अवयव दान करता येतात अशी माहितीही त्यांनी नातेवाईकांना दिली. त्यानंतर दीपकचे वडील विलास श्रीपतराव दराडे, आई कुसुम, भाऊ राजू, माधव व मामा ऍड. भगवानराव घुगे व गणेशराव घुगे यांनी डॉ. गबाळे व डॉ. अतुल जाधव यांच्याशी सविस्तर चर्चा केली आणि दीपकच्या अवयवदानास संंमती दिली.

त्यानुसार ग्रीन कॉरिडॉर तयार करून ४ तासांच्या आत त्या पाचही अवयवांंचे गरजूंच्या शरिरात प्रत्यारोपण करण्यात आले. यात सर्वप्रथम ह्दय तात्काळ नांदेडला व तेथून स्पेशल चार्टर विमानाने मुंबईला पाठवण्यात आले. त्याठिकाणच्या ५३ वर्षीय महिलेला हे ह्दय प्रत्यारोपित करण्यात आले. फुफ्फुस पुणे येथे एका ५० वर्षाच्या स्त्री रूग्णाला बसविण्यात आले. यकृत नागपूरला ५२ वर्षीय पुरूषाला बसविण्यात आले. दोन पैकी एक किडनी छत्रपती संभाजीनगर येथे ५२ वर्षीय पुरूषाला तर दुसरी किडनी ३५ वर्षीय युवकाला प्रत्यारोपित करण्यात आली. विशेष म्हणजे त्याचे नावही दीपक आहे अशी माहिती अवयवदान समन्वयक विनोद डावरे यांनी दिली.

परभणीत अवयवदान यशस्वी करण्यासाठी डॉ.एकनाथ गबाळे, डॉ. अतुल जाधव, डॉ. राहुल टेंगसे, डॉ. श्रध्दा गादेवार, डॉ. निनाद सुर्यतळे, डॉ. निहार चांडक, डॉ. राहुल राठोड, डॉ. कौशल कोंडावार, डॉ. अमिताभ कडतन, डॉ. श्रुती शहारे, डॉ. अजय कुंडगीर आदींचा सहभाग होता.

परभणीत गरजूंकडून किडनीसाठी नोंदणीच नाही
३ महिन्यापुर्वी एका बे्रनडेड रूग्णाने दान केलेल्या दोन्ही किडनी परभणीत पुर्वनोंदणी नसल्यामुळे परजिल्ह्यातील गरजू रूग्णांना देण्यात आल्या. आतादेखील अशीच स्थिती राहिली. त्यामुळे गरजूंनी देवगिरी रूग्णालयात नोंदणी करणे गरजेचे आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR